मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 10 दिवस उलटले तरीही राज्यातल्या सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असूनही सत्तेच्या वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालेला नाही. एकीकडे भाजपा, शिवसेनेमध्ये सत्ता स्थापनेबद्दल चर्चा होत नसताना दुसरीकडे दबावाचं राजकारण जोरात आहे. त्याचाच भाग म्हणून शिवसेना नेते संजय राऊत आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. राज्यपालांची भेट राजकीय नाही. ती सदिच्छा भेट आहे, असं संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले. मात्र अशा बैठकांमध्ये राजकीय परिस्थितीवर चर्चा होतच असते, असं सूचक विधानदेखील त्यांनी केलं. 'भगतसिंह कोश्यारी स्वत: मुख्यमंत्री राहिले आहेत. संसदीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये त्यांनी काम केलं आहे. आम्ही याआधीही अनेकदा त्यांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेतलेलं आहे,' असं राऊत यांनी पत्रकारांना सांगितलं.राज्यपालांच्या भेटीत राजकारणावर चर्चा होणार का, असा प्रश्न पत्रकारांनी राऊत यांना विचारला. त्यावर अशा भेटींमध्ये राजकारणावर चर्चा होतच असते. माझी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली आहे. त्यामुळे त्या अनुषंगानं राज्यपालांशी जे बोलायचं आहे ते बोलेन, असं राऊत म्हणाले. 'तरुण भारत' वृत्तपत्रातून संजय राऊत यांच्यावर टीका झाली आहे. त्यावर भाष्य करताना मी तरुण भारत वाचत नाही. तरुण भारत नावाचं वृत्तपत्र आहे, हेच मला माहीत नाही, असं राऊत यांनी म्हटलं.
महाराष्ट्र निवडणूक 2019: ...म्हणून शिवसेना घेणार राज्यपालांची भेट; संजय राऊतांनी सांगितलं राज'कारण'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2019 10:10 AM