महाराष्ट्र निवडणूक 2019: राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांना संजय राऊत यांचा मेसेज आला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2019 02:37 PM2019-11-03T14:37:18+5:302019-11-03T14:47:45+5:30
Maharashtra Election Result 2019: राज्यात वेगळी समीकरणं जुळून येणार का याकडे लक्ष
मुंबई: सत्तापदांच्या समान वाटपावरून शिवसेना, भाजपामध्ये दबावाचं राजकारण सुरू आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देण्यात यावं असा आग्रह शिवसेनेनं धरला आहे. मात्र भाजपा मुख्यमंत्रिपद सोडायला तयार नाही. त्यामुळे आमच्याकडे इतर पर्याय खुले असल्याचं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर आणखी दबाव टाकला आहे. शिवसेनेकडे 175 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावादेखील त्यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाणार काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
आज मुंबईत राष्ट्रवादीची बैठक झाली. त्यात पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार यांनी आपल्याला शिवसेना खासदार संजय राऊत यांचा मेसेज आल्याचं सांगितलं. 'पक्षाची बैठक सुरू असताना मला संजय राऊत यांचा मेसेज आला. बैठक सुरू असल्यानं मी त्यांच्या मेसेजला उत्तर देऊ शकलो नाही. निवडणुकीनंतर संजय राऊत यांनी पहिल्यांदाच मला मेसेज केला आहे. त्यांना मला कशासाठी मेसेज केला हे माहीत नाही. मी त्यांना थोड्या वेळात फोन करेन आणि खासदार साहेब काय काम आहे, याबद्दल विचारणा करेन,' असं अजित पवार म्हणाले.
Ajit Pawar, Nationalist Congress Party: I received a message from Sanjay Raut a while ago, I was in a meeting so couldn't respond. This is the first time after elections that he has contacted me, I don't know why he has messaged me. I will call him in a while. #Maharashtrapic.twitter.com/HAjKqBlsY3
— ANI (@ANI) November 3, 2019
भाजपा, शिवसेनेतला सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देणार का, असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर आम्ही महाआघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढलो. महाआघाडीत राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्यासह अनेक पक्षांचा समावेश आहे. त्यामुळे सर्व पक्षांशी चर्चा करुनच निर्णय घेतला जाईल, असं पवार यांनी सांगितलं.