मुंबई: महाराष्ट्रात गेल्या १२ दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्यात सर्वाधिक प्रकाशझोतात आलेली व्यक्ती म्हणजे शिवसेना नेते खासदार संजय राऊत. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून संजय राऊतभाजपावर अक्षरश: तुटून पडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत दररोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन भाजपाला लक्ष्य करत आहेत. मात्र आता त्यांनी डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचं दिसत आहे.विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 11 दिवस उलटले तरीही राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. मतदारांनी महायुतीला स्पष्ट कौल दिलेला असताना सत्तेच्या वाटपावरुन सुरू असलेल्या संघर्षामुळे शिवसेना, भाजपामधील चर्चा जवळपास बंद झाली आहे. त्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत वारंवार भाजपावर तोफ डागत असल्यानं दोन्ही पक्षांमधील दरी वाढली आहे. त्यामुळेच त्यांच्यावर टीकादेखील होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज संजय राऊत यांनी ट्विटरवर दुष्यंत कुमार यांची कविता शेअर केली आहे.
पत्रकार परिषदा, सामनाचे अग्रलेख यांच्या माध्यमांमधून भाजपावर टीकेची झोड उठवणाऱ्या संजय राऊत यांना आता 'तरुण भारत'मधून प्रत्युत्तर मिळू लागलं आहे. काल तरुण भारतनं राऊत यांच्यावर अग्रलेख लिहित त्यांचा समाचार घेतला. त्यात त्यांनी राऊत यांना बेताल, विदूषक म्हटलं होतं. आजच्या अग्रलेखात तरुण भारतनं दरबारी राजकारणावरून उद्धव ठाकरेंना सल्ला देताना राऊत यांच्यावर शरसंधान साधलं. दरबारी राजकारण करू लागल्यावर राजाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं, असं तरुण भारतनं आजच्या अग्रलेखात म्हटलं आहे.