नवी दिल्ली: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 11 दिवस उलटूनही सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात नवी समीकरणं दिसू शकतात, असे संकेत शिवसेना, राष्ट्रवादीनं दिले आहेत. मात्र काँग्रेस पक्ष याबद्दल फारसा अनुकूल नसल्याचं समजतं आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल द्विधा मनस्थितीत आहेत. राज्याच्या जनतेनं महायुतीला स्पष्ट कौल दिला असला तरीही शिवसेना, भाजपाला अद्याप सत्तेच्या वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करता आलेला नाही. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत वारंवार भाजपावर टीका करत आहेत. पुढचा मुख्यमंत्रिपदी शिवसेनेचाच होईल, शिवसेनेकडे 175 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणार का याबद्दलची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.राज्याच्या राजकारणात वेगानं घडामोडी सुरू असताना काल शरद पवार यांनी दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेतली. त्यावेळी पवारांनी राज्यातील परिस्थिती सोनिया गांधींना सांगितली. मात्र शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल सोनिया यांनी फारशी अनुकूलता न दाखवल्याचं सूत्रांनी सांगितलं. काँग्रेसनं शिवसेनेला पाठिंबा दिल्यास महाराष्ट्रात भाजपा सत्तेपासून दूर होईल. मात्र याचे परिणाम राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसला सहन करावे लागतील, अशी भूमिका सोनिया यांनी मांडल्याचं समजतं.तत्पूर्वी 1995च्या फॉर्म्युलाप्रमाणे शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकतो, असा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून देण्यात आल्याचं वृत्त आहे. राष्ट्रवादी शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करू शकते. या सरकारला काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा असेल. त्या बदल्यात काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद दिलं जाईल, असा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून देण्यात आल्याचं या नेत्यानं सांगितलं. शिवसेनेनं भाजपासोबतची युती तोडल्यावरच याप्रकारे सत्ता स्थापन होईल, असंदेखील हा नेता पुढे म्हणाला.
महाराष्ट्र निवडणूक 2019: शरद पवारांच्या 'हिंट'मुळे शिवसेना प्रचंड आशावादी; पण काँग्रेस फेरणार स्वप्नांवर पाणी?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2019 11:41 AM