मुंबई: विधानसभेचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 15 अपक्ष आमदार संपर्कात असल्याचा दावा केला होता. यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी 10 अपक्ष संपर्कात असल्याचा दावा पत्रकार परिषदेत केला. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये काँग्रेसला 44 जागा मिळाल्या. जनतेनं दिलेला कौल मान्य असल्याचं थोरात म्हणाले. 'अपेक्षित असताना मतदारांनी चांगला कौल दिला. निवडणुकीपूर्वी वर्तवण्यात आलेले सर्व अंदाज चुकले. जनतेचा कौल सत्तेच्या विरोधात आहे. आम्ही पुढील 5 वर्ष लोकांची चांगली सेवा करू,' असं थोरात म्हणाले. राष्ट्रवादीनं निवडणूक प्रचारात चांगला जोर लावला. त्यातुलनेत काँग्रेस कमी पडली का, असा प्रश्न थोरात यांना विचारण्यात आला. त्यावर काँग्रेस पक्ष निवडणुकीत ताकदीनं उतरला होता, असं थोरात म्हणाले. 'काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली. अशोक चव्हाणांनी मराठवाड्याकडे लक्ष दिलं. पृथ्वीराज चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळली. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी राज्यात अनेक ठिकाणी सभा घेतल्या. काँग्रेस, राष्ट्रवादीनं जे ठरवलं, ते निभावलं,' असं थोरात यांनी सांगितलं.
महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्तास्थापनेसाठी काँग्रेसच्या हालचाली?; 10 अपक्ष संपर्कात असल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 4:02 PM