मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आठवडा होऊनही अद्याप महायुतीला सरकार स्थापन करण्यात अपयश आलं. काही दिवसांपासून शिवसेना, भाजपामध्ये अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी चढाओढ सुरू आहे. या माध्यमातून एकमेकांना दबाव आणल्यानंतर आता सत्तेत महत्त्वाचा वाटा मिळावा, यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कुणाचंही नाव घ्या, सगळे आमच्या संपर्कात असल्याचं म्हणत भाजपावरील दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदारांची बैठक घेतल्यानंतर राऊत पत्रकारांशी बोलत होते. आज शिवसेना भवनात पक्षाच्या आमदारांची बैठक झाली. त्यात उद्धव ठाकरेंनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळी दिवशी केलेल्या विधानावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. दिवाळी दिवशी जे विधान मुख्यमंत्र्यांनी केलं, ते योग्य नाही. तसं विधान त्यांनी करायला नको होतं. भाजपाकडून अद्याप कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. आम्ही स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न करणार असून, आम्ही मित्र पक्षाला शत्रू मानत नसल्याचंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्रिपदाचा उल्लेख झाला नव्हता, असं फडणवीस यांनी केलं होतं. हे विधान उद्धव ठाकरेंनी फारसं रुचलेलं नाही.आज झालेल्या आमदारांच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ गटनेते म्हणून निवड झाली. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सेना आमदारांच्या बैठकीत एकनाथ शिंदेंच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि तो एकमताने मंजूर करण्यात आला. दिंडोशीचे आमदार आणि निष्ठावंत शिवसैनिक सुनील प्रभू यांचीही पुन्हा पक्षाचे प्रतोद म्हणून निवड करण्यात आली आहे. यानंतर शिवसेनेचे आमदार राज्यपाल्यांच्या भेटीसाठी जाणार आहेत. राज्यात अनेक भागांत अजूनही पाऊस सुरू आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानाच्या पाहणीसाठी राज्यपालांनी राज्याचा दौरा करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या आमदारांकडून केली जाणार आहे.
महाराष्ट्र निवडणूक 2019: कुणाचंही नाव घ्या, सगळे आमच्या संपर्कात; शिवसेनेनं वाढवला भाजपावरचा दबाव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 2:50 PM