मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपा-शिवसेना युतीला वर्चस्व मिळालं आहे. मात्र, भाजपा आणि शिवसेनेच्या जागा यंदाच्या निवडणुकीत घटल्या आहेत. तुलनेत, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने चांगलं यश संपादन केलं असून शरद पवारांच्या झंझावती दौऱ्यामुळे राष्ट्रवादीने अर्धशतक पार करत 54 जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादीने 54 तर काँग्रेसनेही फिफ्टी मारत 52 जागांवर विजय संपादीत केला. या विजयानंतर राष्ट्रवादीच्या सर्वच दिग्गज नेते आनंदी दिसले, अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या. मात्र, शिवस्वराज्य यात्रेचे स्टारप्रचारक डॉ. अमोल कोल्हे विजयाच्या सेलिब्रेशनमध्ये कुठेच दिसले नाहीत.
राष्ट्रवादीच्या विजयात पवारांप्रमाणेच खासदार डॉ. अमोल कोल्हेंचंही महत्त्वाचं योगदान आहे. निवडणूकांपूर्वीच्या शिवस्वराज्य यात्रेतील स्टार प्रचारक ते निवडणूक काळातील सभांमध्ये त्यांनी केलेले दौरे लक्षवेधी ठरले आहेत. अमोल कोल्हेंच्या झंझावती सभा निवडणूक प्रचाराकाळात झाल्या. एका दिवसात 5-5 सभा घेऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढविण्याच काम कोल्हेंनी केलंय. विशेष म्हणजे उदयनराजेंच्या साताऱ्यातही कोल्हेंनी सभा घेतली होती. त्यावेळी, राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडूण देण्याचं आवाहन त्यांनी केलं. मान छत्रपतींच्या गादीला, पण मत राष्ट्रवादीला ही कोल्हेंची घोषणा लक्षवेधी आणि चर्चेची ठरली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या यशामध्ये डॉ. अमोल कोल्हेंचाही खारीचा वाटा आहे, असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. मात्र, निकालानंतर कोल्हे गायब असल्याचं दिसून आलं.
निकालानंतर राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी विजयी जल्लोष साजरा केला. अनेक माध्यम प्रतिनीधींना आपल्या प्रतिक्रियाही दिल्या. मात्र, अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया कुठेच दिसली नाही किंवा विजयाचा गुलाल माथी लावलेला त्यांचा फोटोही सापडला नाही. त्यामुळे कोल्हे नेमकं कुठं आहेत? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आता, कोल्हेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन केलंय. तसेच, शिरुर मतदारसंघातील 6 पैकी 5 उमेदवारांचा विजय झाला. त्याबद्दल मायबाप जनतेचं आभार, आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याबद्दल मायबाप मतदारांचे आणि जिवाचं रान करणाऱ्या सर्व नेते व कार्यकर्त्यांचे अंतःकरणापासून आभार !! असे ट्विट अमोल कोल्हेंनी केले आहे.