Maharashtra Vidhan Sabha Live: विधानसभेचे कामकाज स्थगित; संघर्षाचा दुसरा अंक उद्यावर
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 10:44 AM2022-08-17T10:44:50+5:302022-08-17T12:11:57+5:30
एकनाथ शिंदे यांनी केलेली बंडखोरी, महाविकास आघाडीचे सरकार कोसळणे, शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील टोकाला गेलेला वाद, या शिगेला ...
एकनाथ शिंदे यांनी केलेली बंडखोरी, महाविकास आघाडीचे सरकार कोसळणे, शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील टोकाला गेलेला वाद, या शिगेला पोहोचलेल्या सत्तासंघर्षानंतर शिंदे-भाजपचे सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नव्या सरकारचे पहिले अधिवेशन आहे. पावसाळी अधिवेशनात शिंदे सेना विरुद्ध उद्धव ठाकरे सेना असा वाद रंगताना पाहायला मिळणार आहे. तर सत्ता गेल्यानंतर वचपा काढण्याच्या तयारीत महाविकास आघाडी सरकार असून, नव्या सरकारला घेरण्यासाठी रणनीति आखल्याचे सांगितले जात आहे. काय घडतंय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी? जाणून घेऊया...
LIVE
12:26 PM
विधान परिषदेतही राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव
विधानसभेनंतर वरिष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदेतही नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला.
12:11 PM
विधानसभेचे कामकाज स्थगित; संघर्षाचा दुसरा अंक उद्यावर
विधानसभेत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावानंतर काही वेळ कामकाज झाले. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेंकर यांनी सभागृहाची बैठक स्थगित होत असल्याचे सांगितले. आता उद्या गुरुवार, १८ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० वाजता विधानसभेची विशेष बैठक सुरू करण्यात येणार आहे.
11:59 AM
कोणी कंस वागावं, बोलावं, खावं याचं स्वातंत्र्य संविधानाने आम्हाला दिलं: धनंजय मुंडे
कोणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा अधिकार. कोणी कंस वागावं, बोलावं, खावं याचं स्वातंत्र्य संविधानाने आम्हाला दिलं, या शब्दांत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी सुधीर मुनगंटीवारांना टोला लगावला.
11:45 AM
मुंबईकराना मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही, हे सरकार लवकर कोसळेल: आदित्य ठाकरे
ज्यांना सर्व दिले त्यांनी पाठीत खंजीर खुपसला आहे. तिथे जाऊन आमदार फसलेले आहेत. सर्वांसाठी दरवाजे खुले आहेत. जर यायचे तर राजीनामा देऊन आणि निवडणुकीला सामोरे जा. जे मंत्रिमंडळ झाले त्यात खरा मुख्यमंत्री कोण हे सर्वांना कळले असेल. मुंबईकराना मंत्रीमंडळात स्थान मिळालेले नाही. हे सरकार लवकर कोसळेल, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.
11:41 AM
आम्ही स्थगन प्रस्ताव मांडला पण मंजूर झाला नाही: आदित्य ठाकरे
आज आम्ही स्थगन प्रस्ताव मांडला पण मंजूर झाला नाही. हे बेईमानी करणारे सरकार आहे. फक्त राजकारण सुरू आहे. यांना जनतेचा आवाज ऐकू जात नाही. व्हीप हा आमचा आहे..जे चाळीस गद्दार आहेत त्यांचा व्हीप नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना केली.
11:23 AM
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे कर्तृत्व महान: अजित पवार
राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना अजित पवार म्हणाले की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे कर्तृत्व महान आहे. देशातील स्त्री शक्ती आणि आदिवासी शक्तीचा हा गौरव आहे.
11:20 AM
राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींच्या अभिनंदनाच्या ठरावाला विरोधी पक्षनेते अजित पवारांनी दिले अनुमोदन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनिर्वाचित राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींच्या अभिनंदनाच्या ठरावाला विरोधी पक्षनेते अजित पवारांनी दिले अनुमोदन दिले.
11:16 AM
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना परिस्थिती जाणीव: एकनाथ शिंदे
नवनिर्वाचित राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या अभिनंदनाचा ठराव मांडताना, सामान्य महिला देशाच्या सर्वोच्च स्थानी पोहोचल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना परिस्थितीची जाणीव आहे. त्यांची नाळ मातीशी जोडलेली आहे. द्रौपदी मुर्मू यांनी देशाची मान, शान उंचावली आहे, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
11:12 AM
विधानसभेत राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव
नव्या शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला.
11:02 AM
पन्नास खोके एकदम ओक्के, विरोधकांची जोरदार घोषणाबाजी
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीति आखली असून, पन्नास खोके एकदम ओक्के, अशी जोरदार घोषणाबाजी केली.
10:59 AM
हे सरकार अल्पमुदतीचे फारकाळ टिकणार नाही: अमोल मिटकरी
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे सरकार अल्पमुदतीचे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याचा देखील आरोप त्यांनी केला आहे.
10:50 AM
मविआचं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन; 'ईडी' सरकार म्हणत जोरदार घोषणाबाजी
मविआचं विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक, ईडी सरकार म्हणत जोरदार घोषणाबाजी
10:48 AM
हे गद्दारांचं सरकार, फारकाळ टिकणार नाही: आदित्य ठाकरे
आम्ही महाराष्ट्र म्हणून एकजुटीने उभा आहोत. हुकूमशाही सरकारचा विरोध करत आहोत. गद्दार सरकारविरोधात आम्ही लढा देत आहोत. सरकार फारकाळ टिकणार नाही, असा मोठा दावा आदित्य ठाकरेंनी केलाय.
10:47 AM
विधिमंडळाचे अधिवेशन आजपासून
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन बुधवारपासून सुरू होत असून राज्यातील अतिवृष्टीने झालेले नुकसान, आधीच्या निर्णयांना दिलेली स्थगिती यावरून सरकारला घेरण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे.
10:47 AM
विरोधकांची संघर्षाची नांदी
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकत विरोधकांनी संघर्षाची नांदी दिली. मात्र, विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदावरून विरोधकांमधील मतभेदही समोर आले.