मुंबई - विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी विधानसभेत आज मतदान झाले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला त्याला गिरीश महाजनांनी अनुमोदन दिले. त्यानंतर नार्वेकरांच्या विरोधात शिवसेनेचे राजन साळवी यांच्या उमेदवारीसाठी प्रस्ताव राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी दिला तर काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी त्यास अनुमोदन दिले.
सुरूवातीला आवाजी मतदानाने मतदान घेण्यात आले. मात्र विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यानंतर पोलद्वारे मतदान करण्याचे आदेश विधानसभा उपाध्यक्ष नाना झिरवाळ यांनी दिले. मतदानावेळी सभागृहाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले होते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जागेवर उभं राहून आमदारांनी नाव आणि अनुक्रमांक उच्चारून हे मतदान पार पडले. त्यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनी प्रतोद सुनील प्रभू यांचा व्हिप झुगारून भाजपाचे राहुल नार्वेकर यांना मतदान केले.
शिवसेनेत 'व्हिप'वरून संघर्षमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने प्रतोद म्हणून नेमलेले भरत गोगावले यांनी भाजपा-शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान करण्यासाठी व्हिप काढला होता. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना मतदान करण्यासाठी पक्षादेश काढला. त्यामुळे नेमका व्हिप कुणाचा? यावरून एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात संघर्ष झाल्याचं मतदानापूर्वी पाहायला मिळत होते. शिंदे यांच्यासोबत ३९ तर ठाकरे गटात १६ आमदार होते. शिंदे गटातर्फे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी राहुल नार्वेकर यांना मतदानाचा व्हिप काढला तर ठाकरे गटातर्फे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी साळवी यांना मतदान करण्याचा व्हिप जारी केला होता. राष्ट्रवादी व काँग्रेसने साळवी यांना, तर भाजपने नार्वेकर यांना मत देण्याचा व्हिप काढला होता.
विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांना बहुमतभाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना सभागृहात १६४ मते मिळाली. यावेळी बहुजन विकास आघाडी, मनसे, प्रहार आणि अपक्ष आमदारांनी शिंदे आणि भाजपा सरकारच्या बाजूने मतदान केले.