राणा जगजितसिंह यांच्या एंट्रीने आमदार चव्हाणांचा मार्ग खडतर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 03:55 PM2019-10-02T15:55:53+5:302019-10-02T16:02:00+5:30
मतदारसंघाचा आढावा घेतला तर, तुळजाभवानी तीर्थ क्षेत्राचा म्हणावा तितका विकास झाला नाही.
मुंबई - विधानसभा निवडणुकीत उमेदवारी वाटपानंतर राजकीय घडामोडींना अधिक वेग आला आहे. त्याचप्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर विधानसभा मतदारसंघात सुद्धा राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. तर प्रत्येकवेळी, माझी शेवटची निवडणूक असल्याचे भावनिक आवाहन करून मागील दोन निवडणुका जिंकणारे तुळजापूरचे आमदार मधुकरराव चव्हाण यांची यंदाच्या निवडणुकीत चांगलीच दमछाक होणार असल्याची चर्चा पहायला मिळत आहे. तर राणा जगजितसिंह पाटील यांच्या भाजपकडून मिळालेल्या उमेदवारीनंतर परिवर्तन अटळ असल्याचे सूर उमटतांना दिसत आहे.
राणा जगजितसिंह पाटील यांना उस्मानाबादमधुन उमेदवारी मिळण्याचा अंदाज वर्तवला जात असताना, ऐनवेळी त्यांना तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे तुळजापूरचे आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचे बोलले जात आहे. तर लोकसभा निवडणुकीत तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून युतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना १५ हजार मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे पुन्हा असेच चित्र असेले तर राणा जगजितसिंह पाटील यांचा विजय निश्चित समजला जात आहे.
मतदारसंघाचा आढावा घेतला तर, तुळजाभवानी तीर्थ क्षेत्राचा म्हणावा तितका विकास झाला नाही. साखर कारखाने,सूत मील बंद पडल्याने चव्हाण यांच्यावर नेहमीचा टीका होताना पाहायला मिळाले. तर आमदार चव्हाण मंत्री असताना त्यांच्या काळात मोठे उद्योग,व्यवसाय आले नाहीत. त्यातच आता मतदारसंघात शिवसेना व भाजपची ताकत वाढल्याने आमदार चव्हाण यांच्यासाठी विजयाचा मार्ग खडतर झाला आहे. त्यामुळे यावेळी तुळजापूरकर कुणाला विधानसभेत पाठवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहेत.