मुंबई: आजपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session 2021)सुरू झाले आहे.अधिवेशन 28 डिसेंबर 2021 रोजी संपणार आहे. दरवर्षी हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्यात येते. मात्र, यावेळी हे मुंबईत होत आहे. दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपलेली पाहायला मिळाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी अध्यक्ष निवड यासह आरोग्य विभागाचा घोळ, म्हाडा आणि TET परीक्षांवरुन सरकारवर जोरदार टीका केली.
सरकारचा स्वतःच्या आमदारांवर विश्वास नाहीयावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्ष निवडीवरुन राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. स्वतःच्या आमदारांवरच अविश्वास असणारे सरकार आम्ही महाराष्ट्राच्या इतिहासात कधी पाहिले नाही, अशी टीका फडणवीसांनी केली. तसेच, महाराष्ट्र विधानसभेच्या स्थापनेपासून जी प्रथा होती, ती बदलण्याचा अट्टाहास का? असा सवालही केला. याशिवाय, तुम्ही हे रेटून नेणार असाल तर आम्ही आमची लढाई कायदेशीर लढू, असे आव्हान त्यांनी दिले.
इतके असुरक्षित सरकार पाहिले नाहीफडणवीस पुढे म्हणाले की, ज्या सरकारकडे 170 आमदारांचे बहुमत असल्याचे सांगितले जाते, त्या सरकारच्या मनात अध्यक्ष निवडणुकीबाबत संशय आहे. सरकारला स्वत:च्या बहुमातावर विश्वास नाही का ? नियम बदलले तर किमान त्याचा सभागृहासमोरील विचाराचा कालावधी कमी करता येणार नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात इतके असुरक्षित सरकार मी आजवर पाहिले नाही. भाजपचे ज्येष्ठ नेते अटलजी यांनीही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कधी व्हीप लागू केला नव्हता. त्यांच्या नावाचा चुकीचा वापर करू नका. तुमच्या भीतीसाठी कशाला खोटे बोलता ? असेही ते म्हणाले.
सरकारने अपात्र कंपन्यांना टेंडर दिलेयावेळी फडणवीस यांनी राज्यातील भरती प्रक्रियेतील घोटाळ्यावरही भाष्य केले. 21 जानेवारी 2021ला न्यासा नावाच्या कंपनीला अपात्र ठरवण्यात आले होते. पण, 4 मार्च रोजी पुन्हा याच कंपनीला पात्र ठरवले. चार कंपन्यांना डावलून न्यासा कंपनीला संपूर्ण काम देण्यात आले. त्यांनाच काम देण्याची आवश्यकता काय होती? त्यामाध्यमातून आधी आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये घोटाळा झाला आणि मग म्हाडाच्या भरतीमध्ये घोटाळा झाला. जीए सॉफ्टवेअर कंपनीला देखील अपात्र ठरवले होते, त्यानंतर त्यांनी शिक्षक पात्रता परीक्षेत घोटाळा केला. या सरकारच्या काळात एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय होत नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला.