मुंबई : मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला असतानाच महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेसमध्येही सर्व काही सुरळीत असल्याचे चित्र दिसत नाही. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. राज्यातील आघाडी सरकारही अधिक काळ टिकणार नाही, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
काँग्रेसचे मोठे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. याचबरोबर 22 आमदारांनीही विधानसभाध्यक्षांकडे राजीनामा पाठवून दिल्याने काँग्रेस अल्पमतात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना निरुपम यांनी स्वता:च्याच पक्षावर निशाणा साधला आहे. शिंदे यांच्या हालचालींवर दिल्लीतल्या जेष्ठ काँग्रेस नेत्यांचे लक्ष होते. या नेत्यांनी वेळीच त्यांना का आवर घातला नाही? असा सवाल निरुपम यांनी केला.
तसेच त्यांनी यावेळी राज्यातील महाविकास आघाडीवरून काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. महाराष्ट्रात कोणत्याही आधाराशिवाय तीन वेगवेगळ्या विचारधारेच्या पक्षांचे सरकार आहे. अनेक बाबींवर या सरकारचे एकमत होत नाही. त्यामुळे हे सरकार ठिकणे अवघड असल्याचे ते म्हणाले.
राज्यातील महाविकास आघाडीचं तीन चाकाच सरकार असून, हे सरकार कधीही कोसळू शकते. तसेच तीनही पक्षातील नेत्यांमध्ये एकमत नसून त्यांच्या विचारधारा वेगवगेळ्या असल्याने हे सरकार कधीही पडू शकते, असा दावा नेहमीच भाजपकडून केला जात आहे. मात्र आता थेट सत्तधारी पक्षातील नेत्यानेच असे विधान केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.