Mumbai Pune Maharashtra Weather Forecast:राज्यात पावसाचे पुनरागमन झाले असून, पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट, तर काही जिल्ह्यांना ऑरेज अलर्ट जारी करण्यात आला. पुण्यासह पाच जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र किनारपट्टीपासून पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. महाराष्ट्राची किनारपट्टी ते केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र असून, पुढील काही दिवस राज्यातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.
पुण्यासह पाच जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे
हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच पुणे शहर आणि जिल्हा, सातारा जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. या पाचही जिल्ह्यात पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असून, रेड अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबई, पालघर, ठाणे, अहमदनगर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, अमरावती, अकोला या जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
25 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र कसे असेल हवामान?
कोकण आणि पश्चिम घाटलगतच्या भागात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. २५ ऑगस्ट रोजी पुणे, रायगड, सातारा जिल्ह्यातील काही भागांत अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याचा अंदाज आहे. या जिल्ह्यांना हवामान विभागाने सतर्कतेचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे.
मुंबईत पावसाचा जोर कमी होणार असाल, तरी ठाणे, पालघर, नाशिक, रत्नागिरी, जळगाव या जिल्ह्यात २५ ऑगस्ट रोजी पाऊस धुमाकूळ घालण्याचा अंदाज आहे.
सिंधुदुर्ग, कोल्हापूर, अहमदनगरसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, विदर्भातील बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे या जिल्ह्यांत गडगडाटासह वादळी पाऊस होण्याचा अंदाज आहे.
26 ऑगस्ट रोजी नंदूरबार, नाशिक, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.