मुंबई : महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर बुधवारी निसर्ग चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला. या वादळानंतरही मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये रात्री आणि गुरुवारी सकाळी पावसाने झोडपले आहे. मुंबई शहर-उपनगरांसह ठाणे, कल्याण, भिवंडी, वसई-विरार भागात जोरदार पाऊस बरसत आहे. पुण्यातही पावसाने चांगलाच जोर धरला आहे.
दरम्यान, आज मुंबईसह, ठाणे, उपनगर, कोकण, नाशिक, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
मुंबईत आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. मुंबईतील दादर, वरळी, वांद्रे, अंधेरी, बोरीवलीसह बहुतांश भागात सकाळपासून पावसाने हजेरी लावली. काही भागात रिमझिम पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत.
भिवंडी शहरासह ग्रामीण भागात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस आहे. डोंबिवली- कल्याणमध्ये जोरदार पाऊस कोसळत असून अंबरनाथ बदलापुरातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
पुण्यात रात्री उशिरा पावसाने झोडपल्याने मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून रस्त्यावर पडली आहे. पावसाने जोर धरल्याने अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. चक्रीवादळाच्या वाऱ्यामुळे भीमा खोऱ्यात टेमघर आणि कृष्णा खोऱ्यातील मोळेश्वर कण्हेर येथे सर्वाधिक पाऊस पडला. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर धरणात मंगळवारपासून पाऊस आहे.
राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम आज देखील राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जाणवत आहे.
बुधवारी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी मोठ्या संपत्तीचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेले. जोरदार वाऱ्याने झाडे उन्मळून पडल्याच्याही घटना घडल्या आहेत.