मुंबई : महाराष्ट्राला २०१९ सालापर्यंत दुष्काळमुक्त राज्य बनविणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येस आयोजित कार्यक्रमात दिली. मुंबईतील वाहतूक, रस्ते आणि पायाभूत सेवा-सुविधांचा विकास करुन मुंबईला व्हायब्रंट बनविणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येस मुंबई भाजपातर्फे विमानतळाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््यास अभिवादन करुन विविध कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ््याला पुष्पहार घालून अभिवादन केले. पुतळ्यावर पुष्पवृष्टीही करण्यात आली. मुंबई भाजपातर्फे दुष्काळासाठी २१ लाख रूपयांचा धनादेशही मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. आम्ही असा महाराष्ट्र घडवू की, सिंचनाच्या अभावी शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागणार नाही. आता महाराष्ट्रासमोरील आव्हाने पेलून राज्य सुजलाम सुफलाम करू, असे ते म्हणाले. मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, खा. पुनम महाजन, आ. राज पुरोहित, आ. मंगलप्रभात लोढा, आ. पराग अळवणी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार
By admin | Published: May 01, 2016 1:22 AM