ठाणे/नवी मुंबई : वेदांत - फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. सात महिन्यांच्या कालावधीत कंपनीला इन्सेंटिव्ह पॅकेज दिले असते तर हा प्रकल्प महाराष्ट्रात राहिला असता. महाराष्ट्राला यापेक्षा मोठा प्रकल्प दिला जाईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्रातील युवा पिढी बेरोजगार राहू नये म्हणून यापेक्षाही मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणला जाईल, असे पंतप्रधानांनी सांगितले आहे. वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याचे खापर शिंदे-फडणवीसांवर फोडायचे, अशी राजकीय खेळी सुरू असल्याचा आरोप सामंत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.
३९ हजार कोटींचे पॅकेज आधीच्या सरकारने दिले होते. तरीही हा प्रकल्प आलेला नाही, असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात असे कोणतेही पॅकेज ठरले नव्हते. या प्रकल्पाबाबत संबंधित कंपनीने केंद्र सरकार व राज्य सरकार काय सुविधा देऊ शकता, अशी विचारणा करणारे पत्र पाठविले होते. आधीच्या सरकारने त्या पत्राला उत्तर दिले नव्हते, याकडे सामंत यांनी लक्ष वेधले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाल्यानंतर शिंदे यांना या कंपनीबद्दल प्रेझेंटेशन दिले गेले. फडणवीस यांनी प्रकल्पाचे अनिल अग्रवाल यांना भेटून त्यांच्या शंका दूर केल्या, असे सामंत यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी हाय पॉवर कमिटीची मीटिंग आधीच्या सरकारने घेणे गरजेचे होते; पण घेतली नाही.
‘नाणार’ही रोजगार देणारा प्रकल्प होतानाणार प्रकल्पाला उद्धव ठाकरेंपासून सगळ्यांनी विरोध केला म्हणून तो प्रकल्प रद्द केला. ठाकरेंनी हा प्रकल्प बैसूरला करू शकतो, असे पत्र केंद्र सरकारला लिहिले; पण तिथेही विरोध होत आहे. एक प्रकल्प हातातून गेला तर विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर आरोप करीत आहेत. नाणार प्रकल्पदेखील युवा पिढीला रोजगार देणारा होता, असा टोला सामंत यांनी लगावला.
‘त्या’ उद्योगांची यादी आज जाहीर करणार अडीच वर्षांत महाराष्ट्रातून किती प्रकल्प बाहेर गेले, याची यादी उद्याच जाहीर करणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात असल्याची टीका केली. त्या टीकेला त्यांनी उत्तरही दिले. येत्या वर्षभरात महाराष्ट्रातील मराठी उद्योजक दीड लाख रोजगार उपलब्ध करून देणार आहेत.
महाविकास आघाडीमुळेच औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र पिछाडीवर गेला आहे. ‘वेदांत’ही मागील सरकारच्या अनास्थेमुळेच गुजरातला गेल्याचा आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी केला. चांगले झाले की आम्ही केले व वाईट झाले की शिंदे-फडणवीस यांनी केले, असे बोलण्याची सवय विरोधकांना लागल्याची टीकाही त्यांनी केली.