महाराष्ट्राला मिळणार कणखर विरोधीपक्ष !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 01:02 PM2019-11-11T13:02:51+5:302019-11-11T13:14:28+5:30
राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असं सरकार स्थापन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर भाजप विरोधीपक्षाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत भाजपकडून कणखर विरोधकांची भूमिका पार पाडण्यात येईल, अस चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत आहे.
मुंबई - प्रदीर्घ काळ सत्ता उपभोगल्यानंतर 2014 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे विरोधी पक्षाच्या बाकावर बसण्याची वेळ आली होती. त्याचवेळी सत्तेत आलेल्या भाजपने निर्माण केलेले वर्चस्व विरोधकांना झाकोळून टाकणारे होते. तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीच भाजपमध्ये प्रवेश केल्याने विरोधीपक्षाची राज्यातील स्थिती किती बिकट आहे, हे दिसून आले. यामुळेच राज्यात विरोधी पक्षाची कमतरात जाणवल्याची चर्चा होती. परंतु, आता राज्याला भाजपच्या रुपाने कणखर विरोधीपक्ष मिळणार, असे संकेत मिळत आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करून लढलेल्या भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या. तर शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळाल्या आहेत. मात्र 50-50 च्या फॉर्म्युल्यावरून भाजपने भूमिका बदलल्यामुळे शिवसेनेने युतीसोबत सरकार स्थापन करण्यास नकार दिला आहे. तर शिवसेना सोबत येणार नसल्यामुळे भाजपने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला आहे.
एकूणच राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असं सरकार स्थापन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर भाजप विरोधीपक्षाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत भाजपकडून कणखर विरोधकांची भूमिका पार पाडण्यात येईल, अस चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत आहे. याउलट शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस शिवआघाडी फिसकटली आणि युती सत्तेत आली तरी काँग्रेस-राष्ट्रवादी बळकट विरोधीपक्ष म्हणून उभा राहिल अस दिसत आहे.
विधानसभा निवडणूक प्रचारात भाजपकडून समोर विरोधकच नसल्याचा दावा करण्यात आला होता. राज्यात विरोधीपक्षच नाही, असा दावा राज ठाकरे यांनी केला होता. किंबहुना आपल्याला विरोधीपक्ष होण्यासाठी मतदान करा, असं आवाहन त्यांनी मतदारांना केले होते. मात्र मतदारांना राज ठाकरे यांना विरोधीपक्ष नेतेपद मिळेल एवढे मतदान केले नाही. त्याचवेळी मतदारांनी विरोधीपक्ष कणखर मिळेल याची काळजी घेतल्याचं निकालातून स्पष्ट झाले आहे.