मुंबई: महाराष्ट्र वन विभागाने गिधाड संवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावली असून, गिधाडांच्या अधिवासांचे संरक्षण करणे, गिधाडांना अन्न मिळावे म्हणून गिधाड उपहारगृहे संकल्पना राबविणे, गिधाडांवर टॅग बसविणे, गिधाडांच्या अधिवासात गिधाड मित्र तयार करणे, गिधाडांची वस्तिस्थाने असलेली नारळासह इतर झाडे वाचविण्यासाठी प्रोत्साहन देणे, अशी कामे करतानाच आता केंद्र सरकारच्या गिधाड संवर्धन कृती योजना २०२०-२५ मार्फत महाराष्ट्रात लवकरच गिधाड प्रजनन केंद्र उभारले जाणार आहे, अशी माहिती मुख्य वन्यजीव संरक्षक सुनील लिमये यांनी दिली.
भारतातील नऊ प्रजातींपकी महाराष्ट्रात गिधाडांच्या सात प्रजातींची नोंद झाली आहे. पांढऱ्या पाठीचे गिधाड, लांब चोचीचे गिधाड, पांढरे गिधाड, राज गिधाड हे स्थानिक आहेत. तर काळे गिधाड, भुरे गिधाड, हिमालयीन ग्रिफॉन या स्थलांतरित प्रजाती आहेत. महाराष्ट्रात फार कमी ठिकाणी त्यांच्या नोंदी आहेत. पांढऱ्या पाठीचे, लांब चोचीचे, राज गिधाड यांचा समावेश अस्तित्व धोक्यात आलेल्या जिवांच्या यादीत करण्यात आला आहे. या सर्व बाबींचा विचार करत केंद्राच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने गिधाड संवर्धन कृती योजना जाहीर केली आहे. गिधाडांचे संवर्धन करता यावे म्हणून सुमारे २०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद आणि आराखडा तयार केला आहे, असे झाल्यास गिधाड पक्ष्यावरचे संकट टळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
- गिधाडांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र वन विभाग आणि दी कॉर्बेट फाउंडेशन संयुक्त विद्यमाने काम करत आहे. त्यासाठी आता भित्तीचित्राचे प्रकाशन करण्यात येणार आहे. राज्यभरात भित्तीचित्राचे वितरण करण्यात येणार आहे. दी कार्बेट फाउंडेशनने भित्तीचित्राची निर्मिती केली आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि सेव्ह आशियाज व्हल्चर्स फ्रॉर्म एक्सटिंक्शन या संस्थांचा भित्तीचित्रातील माहिती संकलनात हातभार लागला आहे.
- भारतात १९८० च्या दशकापर्यंत लाखोंच्या संख्येने आढळणाऱ्या पांढऱ्या पाठीचे गिधाड, लांब चोचीचे गिधाड, स्लेन्डर बिल्ड गिधाडांच्या संख्येत १९९० दशकांत लक्षणीय घट झाली. ही घट ९९ टक्के होती.
- डायक्लोफेनॅकबाधित मेलेल्या गुरांचे मांस खाल्ल्यास चोवीस तासांत गिधाडांच्या मूत्रपिंडावर विपरीत परिणाम होतो. त्याचे मूत्रपिंड निकामी होते. त्यामुळे २००६ साली डायक्लोफेनॅक औषधावर बंदी आली.- २०१५ साली केंद्राने मानवी उपचारासाठी उत्पादन होणाऱ्या डायक्लोफेनॅकच्या मोठ्या कुपीवर बंदी आणली.
‘मदत हवी भारतातील गिधाडांना’ अशा आशायाच्या भित्तीचित्राद्वारे गिधाड संवर्धानातील समस्या व त्यांचे कशा प्रकारे निराकारण करता येईल, यावर दृष्टिक्षेप टाकण्यात आला आहे. गिधाडांच्या संख्येत झपाट्याने घट होत असून, यामागे डायक्लोफेनॅक हे औषध कारणीभूत आहे, असे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी व इतर संस्थांनी जगाच्या निदर्शनास आणून दिले आहे.- केदार गोरे, संचालक, दी कॉर्बेट फाउंडेशन