मुंबई : राज्यांतील २३६ रेल्वे फाटकांवर रेल्वे ओव्हरब्रिज आणि अंडरब्रिज बांधण्यात येणार आहेत. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधान भवनातील बैठकीत आज याबाबतचा सामंजस्य करार करण्यात आला. या कराराबाबतची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना दिली. या करारामुळे महाराष्ट्र लवकरच रेल्वे फाटकमुक्त होणार आहे. त्यासाठी १० हजार कोटी रुपयांचा खर्च येणार असून, त्यातील अर्धा निधी रेल्वे तर अर्धा निधी केंद्रीय रस्ते निधीतून खर्च करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात २३६ ठिकाणी प्रमुख रेल्वे फाटक आहेत. रेल्वे जात असताना ही फाटके बंद ठेवावी लागतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. वाहतूक बंद ठेवावी लागत असल्याने नुकसानही होत असते. अशा फाटकांच्या ठिकाणी रेल्वे ओव्हरब्रिज वा अंडरब्रिज बांधण्यात येतील. या पुलांच्या बांधकामासाठी भूसंपादन तसेच पायाभूत सुविधांसाठी १ हजार कोटींचा खर्च येणार आहे. हा खर्च राज्य सरकार करणार आहे. महिनाभरात याबाबतच्या परवानग्या घेण्यास सुरुवात होईल. येत्या तीन वर्षांत काम पूर्ण होणार आहे. (विशेष प्रतिनिधी) मुंबई-गोवा कोस्टल रोडचे सादरीकरणबैठकीमध्ये गडकरी यांच्यासमोर मुंबई-गोवा कोस्टल रोडच्या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. सध्याचा हायवे सहा लेनचा करण्यात येणार आहे. कोस्टल रोड हा बंदरांच्या विकासासाठी तसेच पर्यटनदृष्ट्यादेखील महत्त्वाचा ठरणार आहे. कोस्टल रोड झाल्यास बंदरांचा विकास होईल व पर्यटनालाही चालना मिळणार आहे.कोस्टल रोडसाठी ११ हजार कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. सावित्री नदीवरील पूल येत्या मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. पावसाळा सुरू होण्याआधी हा पूल कार्यान्वित झालेला असेल. आधीचा पूल दुर्घटनाग्रस्त झाला तेव्हा ज्यांनी मदतकार्यात भाग घेतला होता त्या सर्वांचा सत्कार नवीन पुलाच्या उद्घाटन प्रसंगी करण्यात येईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्र लवकरच रेल्वे फाटकमुक्त
By admin | Published: March 17, 2017 1:07 AM