मुंबई : स्वच्छ भारत अभियान सर्वेक्षण २०२१ मध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक तब्बल ९२ पुरस्कार पटकावले आहेत. सर्वेक्षणातील ४० टक्के पुरस्कार एकट्या महाराष्ट्राला मिळाले. ६५९ जिल्ह्यांच्या केलेल्या सर्वेक्षणात राज्यातील ३३ जिल्ह्यांचा समावेश असून, देशातील प्रमुख १०० स्वच्छ जिल्ह्यांमध्ये राज्यातील २३ जिल्ह्यांचा समावेश आहे. महाराष्ट्राची ही स्वच्छता चळवळीतील कामगिरी अभिमानास्पद आहे. यातून राज्याची मान देशातच नाही, तर जगातही गौरवाने उंचावली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पुरस्कारप्राप्त नगरपालिकांचे अभिनंदन करण्यात आले.
स्वच्छ शहर म्हणून ओळख असलेल्या मुंबई शहराचे स्थान यंदा ३५ वरून ३७ व्या स्थानावर घसरले आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणारी महापालिका म्हणून मुंबई महापालिकेचा गौरव करण्यात आला आहे. सर्व समावेशक कॅटेगरीत नवी मुंबई शहराची एका स्थानाने घसरण झाली असून, यंदा नवी मुंबई चौथ्या स्थानावर आहे.वन स्टार मानांकनामध्ये देशभरातील एकूण १४७ शहरांचा समावेश आहे. यामध्ये राज्यातील ५५ शहरे आहेत. थ्री स्टार मानांकनामध्ये देशभरातील एकूण १४३ शहरे आहेत, त्यात महाराष्ट्रातील ६४ शहरांचा समावेश आहे. फाइव्ह स्टार मानांकनामध्ये देशभरातील ९ शहरांना सन्मानित करण्यात आले, त्यामध्ये राज्यातील नवी मुंबईचा समावेश आहे.
शांताबाई झाल्या भावुक गेल्या ३४ वर्षांपासून हातात झाडू घेऊन विटा शहराची सेवा करणाऱ्या महिला सफाई कर्मचारी शांताबाई उत्तम हत्तीकर यांना राष्ट्रपतींच्या व्यासपीठावर जाण्याचे भाग्य मिळाले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी राष्ट्रपतींना शांताबाईंची ओळख करून दिली. या सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभल्याने शांताबाई भावुक झाल्या होत्या.
६५९ जिल्ह्यांमध्ये राज्यातील ३३ जिल्ह्यांचा समावेशपुणे (१३), धुळे (२०), ठाणे (२१), चंद्रपूर (२४), सातारा (३५), नाशिक (३७), कोल्हापूर (४३), रायगड (४४), सांगली (४७), नागपूर (५०), सोलापूर (५१), परभणी (५६), औरंगाबाद (५९), नगर (६५), हिंगोली (६६), लातूर (६७), अमरावती (७२), जालना (८३), नंदुरबार (९०), नांदेड (९४), रत्नागिरी (९७), पालघर (९८) आणि सिंधुुदुर्ग (९९).
महाराष्ट्राने स्वच्छतेच्या चळवळीत आघाडी ठेवली आहे. लोकसहभाग हा स्वच्छता चळवळीचा आत्मा आहे. स्वच्छतेची ही चळवळ अशीच अव्याहतपणे सुरू राहावी. त्यासाठी आपण सर्व एकजुटीने करता येतील ते सर्व प्रयत्न करत राहूया.-उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री