Maharashtra Winter Session 2022: ‘देवेंद्र फडणवीस रेटून बोलतात, तुम्हीतर मुख्यमंत्री आहात...’, अजित पवारांचा चिमटा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 06:16 PM2022-12-29T18:16:08+5:302022-12-29T18:16:39+5:30
'देवेंद्र फडणवीस बोलतात तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवतात, एकनाथ शिंदे बोलता तेव्हा एकही भाजपवाला टाळी वाजवत नाही.'
Maharashtra Winter Session 2022: विधानसभेमध्ये आज विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना उद्देशून जोरदार टोलेबाजी केली. 'देवेंद्र फडणवीस बोलतात तेव्हा सर्वजण टाळ्या आणि बाकं वाजवतात. मात्र एकनाथ शिंदे बोलत होते, त्यावेळेस एकही भाजपवाला टाळी वाजवत नव्हता,' असं म्हणताच विधानसभेत एकच हशा पिकला.
देवेंद्र फडणवीस आक्रमकपणे बोलतात, पण...
अजित पवार पुढे म्हणतात की, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा सभागृहात कोट्यवधींचा प्रस्ताव मांडतात तेव्हा भाजपचे आमदार टाळ्या वाजवत नाहीत. अध्यक्ष महोदय, तुम्ही टीव्हीमध्ये बघा. हरीश पिंपळे तुम्ही फक्त अधूनमधून वाजवायचे. तानाजीरावांनी आमच्याच लोकांना सांगितलं की, टाळ्या वाजवा. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री असताना आक्रमकपणे विधानसभेत भूमिका मांडतात. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असून त्या आक्रमकपणे बोलत नाहीत,' असा दावाही अजित पवारांनी यावेळी केला.
तुम्ही जरा मागे येत आहात
पवार पुढे मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हणतात, 'राईट टू रिप्लाय देत असताना तुम्ही इतके अस्वस्थ होत होता की, माझं तुमच्याकडे लक्ष होतं. मी चेष्टा करत नाही किंवा गंमतीने बोलत नाही. माझं मुख्यमंत्र्यांना सांगण आहे, कुठलीही एखादी गोष्ट सांगत असताना, तुम्ही मुख्यमंत्री आहात, मान्यता करतो, प्रस्ताव पाठवला का? असं का बोलता? हे मी करणार, असं बोला. मान्यता वगैरे काय? तो तुमचा अधिकार आहे. हे महाराज उपमुख्यमंत्री असताना रेटून बोलतात. तुम्ही मात्र जरा मागे मागे येतायत', असा टोलाही अजित पवारांनी लगावला.