नागपूर: विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेना आणि भाजपामध्ये 'सामना'वरुन चांगलाच सामना रंगल्याचं आज पाहायला मिळालं. राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सामनाचा अंक काढला आणि शिवसेनेनं पूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेली टीका वाचून दाखवली. त्यावरुन शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी हरकत घेतली. तुम्ही तर सामना वाचत नाहीत म्हणाला होता, याची आठवण पाटील यांनी करुन दिली. त्यावर फडणवीसांनी मजेशीर प्रत्युत्तर दिलं.शिवसेना किती भूमिका बदलणार, असा सवाल करत देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेचा समाचार घेण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वर्तमानपत्रातील मजकूर वाचून दाखवला. 'आज शिवसेनेच्या सुनील प्रभूंनी त्यांच्या भाषणात बाळासाहेबांच्या आधी शरद पवारांचं नाव घेतलं. शिवसेनेनं भूमिका किती आणि कशी बदलली, हे दाखवण्यासाठी मी सामनाच सोबत आणला आहे,' असं फडणवीस म्हणाले. यानंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील उभे राहिले. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी एका मुलाखतीत ते सामना वाचत नसल्याचं म्हटलं होतं. मात्र आता ते सभागृहात सामना घेऊन गेले आहेत. यावर माझी हरकत आहे, असं म्हणत पाटील यांनी आक्षेप नोंदवला.गुलाबराव पाटील यांनी घेतलेल्या हरकतीला फडणवीसांनी मजेशीर उत्तर दिलं. सामना वाचवण्यावर तुम्ही हरकत घेतली, तर संजय राऊत तुम्हाला मंत्री होऊ देणार नाहीत, असा चिमटा फडणवीसांनी काढला. यानंतर फडणवीसांनी सामनामधून शरद पवारांवर करण्यात आलेली टीका वाचून दाखवली. त्यावर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी हरकत घेतली. तेव्हा, शरद पवार हे मोठे नेते आहेत आणि त्यांच्याविषयी मला नितांत आदर आहे. परंतु, ही विधानं माझी नसून 'सामना'मधली आहेत आणि गेली पाच वर्षं विरोधी पक्षनेते हेच वृत्तपत्र इथे वाचून दाखवत होते, याकडे फडणवीसांनी लक्ष वेधलं. तुम्ही तर सामना वाचत नव्हतात, याची आठवण काही शिवसेना आमदारांनी करून देताच, मी आता 'सामना'चं सबस्क्रिप्शन लावलंय, असं ते हसत हसत म्हणाले. अखेर, शरद पवार हे सभागृहाचे सदस्य नसल्यानं, त्यांच्याबद्दलची वाचून दाखवलेली विधानं कामकाजातून काढून टाकण्याचे निर्देश विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
...तर संजय राऊत तुम्हाला मंत्री होऊ देणार नाहीत; फडणवीसांचा चिमटा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 4:20 PM