नागपूर - एकीकडे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात खासदार राहुल शेवाळे यांनी सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा उल्लेख करत थेट ठाकरे गटावर हल्ला चढवला. तर दुसरीकडे आता हिवाळी अधिवेशनात भाजपा-शिंदे गटाने दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा मुद्दा चर्चेत आणत आदित्य ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी भाजपाचे नितेश राणे आणि शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
सभागृहात भरत गोगावले म्हणाले की, ९ जून २०२० ला दिशा सालियान युवतीचा संशयास्पद मृत्यू होणे. दिशाचा मृत्यू कुठल्या परिस्थितीत झाला? तपासात अद्याप निष्कर्षापासून पोहचले नाही. दिशा सालियान ही सुशांत सिंह राजपूतचे काम सांभाळत होती. त्या दोघांमध्ये झालेला फोन संवाद, व्हॉट्सअप चॅट उघड न होणे. दिशा मृत्यूनंतर सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू होणे. या मृत्यूचे गुढ उकललं नाही. या प्रकरणी सत्य बाहेर येणे गरजेचा आहे. दिशा सालियानचा मृत्यूवेळी तिच्यासोबत कोण कोण होते? हे समोर यायला हवा. दिशा सालियानच्या मृत्यूशी पूर्णपणे चौकशी होऊन दोषींना शिक्षा झाली पाहिजे. या प्रकरणी खुलासा होणे गरजेचे आहे असं त्यांनी म्हटलं.
तर २०२० पासून दिशा सालियान मृत्यू प्रकरण गाजत आहे. एका मुलीचा संशयास्पद मृत्यू होतो आणि त्याची चौकशी मुंबई पोलीस करतात. त्या चौकशीत दोनदा तपास अधिकारी बदलला जातो. ८ जूनच्या रात्री कोण कोण उपस्थित होता. कुणाच्या राजकीय दबावापोटी हे प्रकरण दडपण्यात आले. दिशा सालियन प्रकरण सीबीआयकडे नसून मुंबई पोलिसांकडे ही केस आहे. सीसीटीव्ही फुटेज का गायब करण्यात आले. ८ जूनच्या पार्टीत कोण होते? या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. त्या रात्री कुठला मंत्री होता? काहीतरी लपवण्यासाठी विरोधक गोंधळ घालतायेत का? असा सवाल भाजपा आमदार नितेश राणेंनी केला.
दरम्यान, सरकारने या प्रकरणाची फेरचौकशी करावी अशी मागणी सत्ताधारी आमदारांकडून करण्यात आली. दिशा सालियान हत्या प्रकरण सभागृहात मांडल्यानंतर दोन्ही बाजूने जोरदार गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी विधानसभेचं कामकाज सुरुवातीला २० मिनिटे तर त्यानंतर १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. त्यामुळे संसदेपाठोपाठ आता राज्याच्या हिवाळी अधिवेशनात दिशा सालियान प्रकरण गाजलं. तत्पूर्वी विधान भवनाच्या पायऱ्यांवर शिंदे गटाच्या आमदारांनी ये AU AU कोण है अशा प्रकाराचे बॅनर्स झळकावत आंदोलन केले होते.