नागपूर: विधानसभेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरत आहे. आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना नागपूर अधिवेशन कालावधीत निलंबित करण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्षांना अपशब्द वापरल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. जयंत पाटील यांच्या विधानाबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यानंतर आता स्वत: जयंत पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
बोलताना माझा माईक चालू नव्हतासभागृहाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले की, 'सभागृहात सत्ताधारी पक्षाचे आमदार कधीही बोलतात. सत्ताधारी पक्षाचे 14 सदस्य बोलतात आणि बाकीच्यांना बोलू देत नाहीत. यावेळी मी आवाहन केले निर्लज्जपणा सारखे वागू नका. मी बोलत असताना माझा माईकही चालू नव्हता. तरीदेखील आज माझ्याविरोधात निलंबनाचा ठराव मांडला गेला,' असं पाटील म्हणाले.
संबंधित बातमी- "मी दिलगिरी व्यक्त करतो; जयंत पाटलांचे निलंबन मागे घ्या", अजित पवारांची विनंती
ते पुढे म्हणाले की, 'सत्ताधाऱ्यांकडून विरोधीपक्षाचा आवाज दाबला जातोय. गेल्या 32-33 वर्ष माझ्याकडून कधीही अपशब्द वापरला गेला नाही. माझे भाषण आणि माईक चालू नव्हता. पण सरकारला जितेंद्र आव्हाड यांनी सांगितला तो प्रसंग टाळायचा होता, म्हणून माझे निलंबन केले. निर्लज्जपणा आपण सहजासहजी बोलतो. शेवटी सभागृहाने निर्णय घेतला आहे. माझ्याकडून कुणाचाही अवमान करण्याचा उद्देश नव्हता. सध्या जे सुरू आहे, ते लोकशाहीच्या विरोधात आहे', असा आरोप जयंत पाटलांनी केला.