'मुंबई कुणाच्या बापाची नाही, मुंबईवर दावा खपवून घेणार नाही'; सीमाप्रश्नी देवेंद्र फडणवीस आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 01:39 PM2022-12-28T13:39:53+5:302022-12-28T13:39:53+5:30
मुंबईला केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, मुंबई ही कर्नाटकाचीच आहे, अशी वक्तव्ये कर्नाटकातील मंत्री आणि आमदारांनी केली.
नागपूर:कर्नाटककडून सुरू असलेल्या कुरघोडीचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सीमा भागातील जमीन महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी निर्धाराने लढा देण्याचा ठराव मंगळवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मंजूर करण्यात आला. दरम्यान, मुंबईला केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, मुंबई ही कर्नाटकाचीच आहे, अशी वक्तव्ये कर्नाटकातील मंत्री आणि आमदारांनी केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक सरकारला कडक शब्दात सुनावले.
अजित पवारांची सरकारकडे मागणी
कर्नाटकातील नेत्यांनी केलेल्या वक्तव्याचे जोरदार पडसाद विधानसभेत उमटले. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे राज्य सरकारचे लक्ष या मुद्द्याकडे वळवून कर्नाटक सरकारला कडक शब्दात सुनावणारे पत्र पाठवण्याची मागणी केली. महाराष्ट्रात विविध राज्यातील लोक गुण्यागोविंदाने राहतात, त्याचा आपल्याला अभिमान आहे. कर्नाटकातील विधान परिषदेचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी मुंबई ही कर्नाटकचीच आहे, असे वक्तव्य करून मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. कर्नाटककडून सीमाप्रश्नाला चुकीचे वळण देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे अजित पवार म्हणाले.
देवेंद्र फडणवीस सीमाप्रश्नी आक्रमक
अजित पवारांच्या मुद्द्याची देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली. जो विषय उपस्थित केला तो महत्त्वाचा आहे. ज्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे बैठक झाली, तेव्हा दोन्ही राज्यांनी नवे दावे न करण्याचे मान्य केले होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणानुसारच काल आपण ठराव केला आहे. कर्नाटकाच्या मंत्र्यांनी किंवा आमदारांनी किंवा काँग्रेसच्या अध्यक्षांनी केलेले दावे बैठकीशी विसंगत असून पूर्णपणे चुकीचे आहेत, असं देवेंद्र फडणीस म्हणाले.
मुंबई कुणाच्या बापाची नाही
मुंबईवर दावा सांगण्याचा आम्ही निषेध आम्ही करतो. लवकच निषेधाचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवू. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देऊ. गृहमंत्र्यांसमोर ठरलेल्या गोष्टींचे उल्लंघन करणे दोन्ही राज्याच्या संबंधाबाबत योग्य नाही. मुंबई महाराष्ट्राचीच, ती कुणाच्या बापाची नाही. मुंबईवर दावा सांगणे खपवून घेणार नाही. अमित शहांनी ठरललेल्या गोष्टीचे पालन महाराष्ट्र सरकार करत आहे. त्यामुळे शहांनी कर्नाटकाच्या बोलघेवड्या लोकांना तंबी दिली पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.