नागपूर - हिवाळी अधिवेशनच्या पहिल्या आठवड्याचा आज शेवटचा दिवस आहे. गुरुवारी सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांचे निलंबन करण्यात आले. त्यामुळे आजच्या कामकाजात सभागृहात भाग घ्यायचा की नाही याबाबत विरोधक बैठकीत ठरवतील. परंतु सत्ताधाऱ्यांकडून सोयीचं राजकारण सुरू असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केला.
अजित पवार म्हणाले की, भुजबळ माझगाव मतदारसंघातून आमदार होते, मुंबईचे महापौर राहिले आहे. त्यांनी उदाहरण देताना मुंबईचा उल्लेख सोन्याचं अंड देणारी कोंबडी केला. त्यावरून सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातला. परंतु विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस म्हणून काम पाहत होते. त्यांनीही मुंबईला सोन्याच अंड देणारी कोंबडी असा उल्लेख केला होता. इतर भाजपा नेत्यांनीही हा उल्लेख केला होता. मला सभागृहात बोलण्याची संधी मिळाली तर मी कागदे सादर करेन. सभागृहात जयंत पाटील यांनी जे काही वक्तव्य केले त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. परंतु सत्तेच्या जोरावर बहुमत वापरून गोंधळ घालायचा. सत्ताधारी-विरोधी पक्ष दोघांनी समन्वयाची भूमिका घेऊन वागलं पाहिजे. सभागृहात महागाई, बेरोजगारी, विदर्भ-मराठवाड्यातील प्रश्नावर चर्चा होण्यासाठी अधिवेशन बोलावलं आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच दिशा सालियान प्रकरण काढण्याची गरज नव्हती. तिच्या आईवडिलांनी केलेले आवाहन वाचलं. राष्ट्रपतींना केलेले निवेदन वाचलं. मुद्दामहून लोकांचे लक्ष विचलित होण्यासाठी असा प्रयत्न सत्ताधारी पक्षाचा सुरू आहे. नको त्या प्रश्नांची चर्चा होतेय. महिलांना मानसन्मान देणारे आपण आहोत. जे हयात नाही त्यांच्याबद्दल बोलायचं हे कुठेतरी थांबले पाहिजे. जुन्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न केला जातोय हे अतिशय चुकीचे आहे. पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांच्यावर भाजपा नेत्यांनी किती आरोप केले होते. परंतु ते आता त्यांच्या मंत्रिमंडळात असल्याने सगळं गोमूत्र शिंपडून पवित्र केलंय का? असा सवालही अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला.
भूखंडाचे प्रकरण भाजपा नेत्यांनीच काढलेसत्ताधारी पक्षातील जे असतात त्यांची चौकशी होत नाही. त्यांना क्लीनचीट दिली जाते. उद्धव ठाकरे सरकार काळात एकनाथ शिंदेंबाबत भूखंडाचं प्रकरण भाजपानेच पुढे आणलं होते. शिंदे गटाने आता भाजपाला पाठिंबा दिल्यानंतर ते भूखंड वाटपाच्या प्रकरणातून माघार घेतायेत. हे महाराष्ट्रातील जनतेने पाहावे असंही अजित पवार म्हणाले.
सीमाप्रश्नावर अद्याप ठराव नाहीमहाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर एकमताने ठराव करू असं कामकाज सल्लागार बैठकीत ठरलं होते. परंतु आठवड्याचा शेवटचा कामकाज आहे. परंतु आजच्या पत्रिकेतही हा विषय नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री हे केवळ त्या राज्याचे आहे. उगीच लोकांना बरे वाटतंय त्यासाठी काहीही विधान करतायेत असं सांगत अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.