विशेष लेख: आम्हाला माहिती असलेले अजितदादा कुठे हरवले..?
By अतुल कुलकर्णी | Published: December 25, 2022 08:44 AM2022-12-25T08:44:31+5:302022-12-25T08:45:03+5:30
संपलेल्या आठवड्यात ते अजितदादा कोणालाच कुठं का दिसेनात..? हा प्रश्न ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना पडलाय.
अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई
प्रिय अजितदादा,
नमस्कार.
आपण विधानसभेचे विरोधी पक्षनेते झालात. त्या नात्याने नागपुरात आपलं हे पहिलं अधिवेशन. विरोधी पक्ष नेता हा प्रति मुख्यमंत्री असतो. आजवर महाराष्ट्रानं अनेक मजबूत विरोधी पक्षनेते पाहिलेत. आपण तर मुळातच कणखर, सडेतोड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहात मात्र संपलेल्या आठवड्यात ते अजितदादा कोणालाच कुठं का दिसेनात..? हा प्रश्न ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना पडलाय. विधानभवनात फिरताना अशा अनेक गोष्टी कानावर पडताहेत. तुमच्या कानावर घालायचा प्रयत्न केला... पण तुम्ही भेटला नाहीत. म्हणून हे पत्र लिहायला घेतलं.
उद्धव ठाकरे नागपूरला आले, तेव्हा पुढचे तीन दिवस आक्रमक होत विधानभवनाचं कामकाज बंद पाडायचं, असं तुमच्या बैठकीत ठरलं होतं म्हणे... मात्र प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जमिनीचा विषय सभागृहात मांडायचं ठरलं, मात्र तो विषय सोडून तुम्ही भलताच विषय सुरू केला... तेव्हा नीलमताईंच्या केबिनमध्ये बसलेल्या ठाकरेंनाही जोर का झटका हळूच लागला म्हणे...
काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांच्या अनेक सहकारी संस्था आहेत. त्यांची कामं करायची नाहीत, असं सहकार मंत्री अतुल सावे यांना कोणी सांगितलं..? हे तुम्हाला माहिती होतं. तुम्ही ते सभागृहात बोलावं असा सगळ्यांचा आग्रह होता. मात्र, तुम्ही अतुल सावेंना सभागृहाच्या बाहेर भेटलात... ‘काय सावे साहेब, तुम्ही बदललात...’, असं म्हणून मोकळे झालात. जे सभागृहात बोलायचं ते तुम्ही काहीच बोलला नाहीत. पण, अतुल सावेंनी तुमची दोन-चार कामं करून दिली... असंही एक आमदार सावेंच्या दालनात जेवताना सांगत होते. दादा अशा चर्चांना बुड ना शेंडा... मात्र, आपल्यासारख्या नेत्यांबद्दल असं बोललं की वाईट वाटतं.
आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निलंबित केलं... त्यावरून तुम्ही सभागृहात तत्काळ दिलगिरी व्यक्त करून टाकली... त्यावरूनही स्वपक्षातच तीव्र नाराजी पसरली आहे. दादा, सत्ताधारी पक्षाचे १४ आमदार दिशा सालियन वरून बोलले. विरोधी बाकावरून एकालाही कोणी बोलू दिलं नाही... अशा अध्यक्षांविरुद्ध वेलमध्ये बसू, असं सुनील भुसारा यांनी तावातावानं सांगितलं... ते देखील कोणी ऐकलं नाही..! हे खरं आहे का...? शुक्रवारी विधिमंडळाच्या पायऱ्यावर जे आंदोलन झालं, त्यात आपण ज्या पद्धतीने उभे होता, त्यावरून ती ‘बॉडी लँग्वेज’ आम्ही ज्या दादांना पाहिलं, त्या दादांची नव्हती... अशी खंत अनेकांनी बोलून दाखविली. त्यावरून विरोधी पक्षाच्या प्रत्येक आमदारांत अस्वस्थता पसरलीय...
तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक सकाळी- सकाळी घेता. त्या बैठकीत जे काही ठरतं ते आमदारांना कोण सांगणार...? असा सवाल बाळासाहेब थोरातांनी आपल्याला केला होता म्हणे... दादा, जे बैठकीत ठरतं ते जर आमदारांना कळालंच नाही तर त्याची जबाबदारी कोणाची..? विरोधी पक्ष नेत्याचं कार्यालय किती व्हायब्रंट पाहिजे असं बाळासाहेब नाराजीनं बोलत होते... जे ठरतं त्यानुसार काहीच घडत नाही... मग बैठकीला तरी कशाला यायचं..? असं म्हणून शुक्रवारी अनेक नेत्यांनी आपल्या बैठकीला दांडी मारल्याचीही माहिती आहे. ठाकरे सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, या तिन्ही पक्षांच्या आमदारांना दादा असं का वागताहेत याचा ठावठिकाणा लागेना झालाय...
आदित्य ठाकरे सगळे दिवस आक्रमक दिसत आहेत, नाना पटोले बोलताना दिसत आहेत मात्र काँग्रेसचे अन्य नेते आणि आपण स्वतः असं गप्प का झालात..? आपण गप्प झालात म्हणून आपल्यासोबत सावलीसारखं राहणारे आमचे धनुभाऊ, म्हणजेच धनंजय मुंडे देखील गप्प झाले आहेत... गेले कित्येक महिन्यांत त्यांचा आवाज महाराष्ट्रानं ऐकला नाही. असं गप्प बसण्यानं पंकजा मुंडेंना शह देण्यासाठी धनुभाऊ भाजपमध्ये जाणार, अशा फुसक्या बातम्यांना बळ मिळू लागलंय...
दादा, एक सांगू...? तुरुंगवास भोगून आलेले छगन भुजबळ संधी मिळेल तिथं आक्रमकपणानं बोलत आहेत..! स्वतःवर व्यक्तिगत हल्ले होत असतानाही जितेंद्र आव्हाड संधी मिळेल तिथं बोलताना दिसतात... मात्र, त्यांच्या पाठीशी पक्ष खंबीरपणाने उभा नाही, असं चित्र का तयार होत आहे...? याचे उत्तर तुम्ही नाही द्यायचं तर कोण देणार दादा...?
उद्धव ठाकरे एका दिवसासाठी आले. तेवढ्यापुरतं सगळे आक्रमक झाले. मात्र, त्यांची पाठ फिरताच सगळे पुन्हा गप्पगार झाले...! असल्या चर्चा पक्षासाठी चांगल्या की वाईट माहिती नाही... मात्र दादा, आपल्यासाठी त्या चांगल्या नाहीत.
आपल्याला या गोष्टी कोणी येऊन सांगणार नाही. म्हणून पत्र लिहायला घेतलं. ह्या गोष्टी खोट्या असतील तर आनंदच आहे... उलट या गोष्टी खोट्या निघाव्यात असंच आम्हाला वाटतं... मात्र, खऱ्या असतील तर दादा, यावर गंभीरपणानं विचार करा... एवढ्या प्रेमानं, आपुलकीनं कोण लिहिणार नाही... आपल्या काळजीपोटी लिहिलंय... पुढच्या आठवड्यात आम्हाला माहिती असलेले दादा महाराष्ट्राला दाखवून द्या...!
तुमचाच, बाबूराव
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"