'मराठा व ओबीसींबाबत दुटप्पीपणामुळे भाजपाला फटका', झेडपी निवडणूक निकालानंतर अशोक चव्हाणांचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 10:31 PM2021-10-06T22:31:22+5:302021-10-06T22:32:02+5:30
Maharashtra ZP Election Results 2021: आजच्या निकालांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ झाल्याबद्दल संबंधित जिल्ह्यातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.
नांदेड : मराठा आरक्षण व ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत दुटप्पी भूमिका घेतल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीत भाजपला मोठा फटका बसल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. (Congress Leader Ashok Chavan reaction On Zilla Parishad, Panchayat Samiti By Election Results)
आजच्या निकालांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ झाल्याबद्दल संबंधित जिल्ह्यातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. चव्हाण म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या ८५ जागांमध्ये काँग्रेसच्या १३ जागा होत्या. मात्र, यावेळी १७ जागा निवडून आल्या आहे. महाविकास आघाडीचा विचार करता रिक्त झालेल्या ३७ जागांच्या तुलनेत वेगवेगळे लढूनही यावेळी ४६ जागा निवडून आल्या आहेत. दुसरीकडे भाजप ३१ जागांवरून २३ वर घसरली असून, वंचित बहुजन आघाडीच्या १२ जागांची संख्या ८ वर आली आहे.
मराठा आरक्षण असो वा ओबीसींचे राजकीय आरक्षण, दरवेळी भाजपने दुटप्पी भूमिका घेतली. केंद्रातील त्यांच्या सरकारला ही दोन्ही आरक्षणे कायम ठेवण्यासाठी निर्णायक भूमिका बजावण्याची संधी असताना त्यांनी योग्य ते निर्णय घेतले नाहीत. सार्वजनिकरित्या बोलताना ओबीसींचे तारणहार आम्हीच, मराठ्यांचे तारणहार आम्हीच, अशी भूमिका घ्यायची आणि प्रत्यक्ष निर्णय घेण्याची वेळ आल्यावर नामनिराळे राहण्याचे भाजपचे धोरण मतदारांच्या लक्षात आले असून, त्यांनी मतदानातून नाराजी व्यक्त केल्याचे अशोक चव्हाण पुढे म्हणाले.
लोकशाहीचे रक्षणही काँग्रेसच करु शकतो ही जनतेची धारणा - नाना पटोले
राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीत काँग्रेसला मिळालेले यश हे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, त्यांनी मेहनत घेतल्यानेच या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाची कामगिरी चांगली झाली असून ही तर सुरुवात आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले आहे. निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना पटोले म्हणाले की, विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा लोकशाहीत जनता हीच मोठी असते, जनतेचा विश्वास महत्वाचा असतो, आम्ही जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करु शकलो.
काँग्रेस पक्षाने स्वंतत्र्यापूर्वीही संघर्ष केला आणि स्वातंत्र्यानंतर देश उभा करण्यासाठीही संघर्ष केला परंतु मागील काही वर्षात सत्तेत आलेल्या भाजपाची धोरणे ही शेतकरीविरोधी, कामगारविरोधी, बहुजनविरोधी आणि देश विकायला निघालेली आहेत आणि याला फक्त काँग्रेस पक्षच थोपवू शकतो, संविधान, लोकशाहीचे रक्षणही काँग्रेसच करु शकतो ही जनतेची धारणा आहे म्हणूनच त्यांनी काँग्रेस पक्षावर विश्वास टाकलेला आहे. या यशाबद्दल नाना पटोले यांनी राज्यातील जनता व कार्यकर्ते यांचे आभार मानले आहेत.