मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. राज्यात मात्र जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या समर्थकांना महाजन यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याची स्वप्न पडू लागली आहे. गिरीश महाजन यांच्या भावी मुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा देणारे बॅनर जळगावात लावण्यात आले आहे. त्यामुळे, या विषयाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातही खांदेपालटाचे जोरदार वारे वाहत आहेत. केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी मंत्रिपदाची जबाबदारी नको असल्याचे स्पष्ट केल्यानंतर, त्यांच्या जागी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे, फडणवीस यांच्या जागी गिरीश महाजन यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडू शकते, असा विश्वास महाजन यांच्या समर्थकांना आहे. म्हणूनच, त्यांच्या समर्थकांनी जळगाव शहरात, महाजन यांना महाराष्ट्राचे लोकनेते व भावी मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा प्रदान करणारे बॅनर लावले असावेत अंदाज वर्तवला जात आहे.
राज्यात भाजपवर आलेल्या अनेक राजकीय संकटात गिरीश महाजन यांनी महत्त्वाची भूमिका बजावत भाजपला यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, महाराष्ट्रातील अनेक आंदोलने, मोर्चे यशस्वीरित्या हाताळण्याचं कसब गिरीश महाजन यांच्याकडे आहे. त्यामुळे, फडणवीस जर केंद्रात गेले तर मुख्यमंत्री पदाची माळ महाजन यांच्या गळ्यात पडण्याची अपेक्षा त्यांच्या समर्थकांना आहे.