मुंबई : अत्यंत अवघड व कठीण श्रेणीत गणला जाणारा तैलबैला किल्ला सर करत आठ वर्षांची असलेली महाराष्ट्राची हिरकणी ग्रिहिथा सचिन विचारे हिने पुन्हा एकदा नवा विक्रम रचला आहे. या किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची ३,३३२ फूट आहे. पुणे जिल्ह्यात हा किल्ला येत असला तरी रायगड तालुक्याच्या सीमेवर आणि सुधागड किल्ल्याच्या अगदी समोर आहे. तैलबैला किल्ल्याची उंची ३०० फूट आहे.
ग्रिहिथा हिने तिची बहीण हारिता सचिन विचारे व वडिलांसोबत हा किल्ला सर केला आहे. तैलबैला किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी लोणावळाहून ३५ किलोमीटरचा प्रवास करून तैलबैला या गावात पोहेचले. या मोहिमेसाठी कल्याण येथील सह्याद्री टीमचे पवन घुगे, दर्शन देशमुख, रणजित भोसले, सुचित लाड, स्वप्निल भोईर, सुनील कणसे, संजय यांनी तांत्रिक मदत केली.
तैलबैला प्रस्तरारोहण हा कठीण आणि तांत्रिक श्रेणीत ९० अंशातील सरळ उभी कठीण चढाई करावी लागते. चढण्यासाठी तांत्रिक कौशल्याची आवश्यकता असते. कारण शिखरावर पोहोचण्यासाठी २५० ते ३०० फूट तांत्रिक चढाई आणि नंतर रॅपलिंग समाविष्ट असते ज्यासाठी सर्व गिर्यारोहण उपकरणे आणि प्रमाणित अनुभव आवश्यक असतात.