नवी दिल्ली, दि. 14 - भारतामध्ये अपघाती मृत्यूंचा वाढणारा आकडा चिंतेचा विषय असून यासाठी नियमांचं होणारं उल्लंघनच अनेकदा कारणीभूत ठरतं असल्याचं समोर येत आहे. विनाहेल्मेट प्रवास केल्याने दिवसाला 28 दुचाकीस्वारांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकीकडे दुचाकीस्वारांचा हा आकडा धक्कादायक असताना, चारचाकी वाहनचालकही बेजबाबदापणे वाहन चालवत असल्याचं समोर येत आहे. सीटबेल्ट न वापरल्याने दिवसाला 15 वाहनचालकांचा अपघाती मृत्यू होत आहे. राज्यांनी वाहतूक मंत्रालयाशी शेअर केलेल्या माहितीमधून हा आकडा समोर आला आहे.
2017 वर्ष अपघाताचं वर्ष ठरलं आहे असं म्हटलं तरं वावगं ठरणार नाही. यावर्षी 100 अपघातांमधील 31 जणांचा मृत्यू झाला आहे. 2005 मध्ये हा आकडा 21.6 होता, तर 2015 मध्ये 29 होता.
राज्यांच्या पोलीस आणि वाहतूक विभागाने हेल्मेटचा वापर न केल्याने झालेल्या मृत्यूंची माहिती गोळा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. राज्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दर पाच अपघातांमधील एका दुचाकीस्वाराचा मृत्यू होत आहे. दुचाकीस्वारांच्या मृत्यूचा एकूण आकडा 10,135 आहे. यामध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर (3818) असून त्यानंतर अनुक्रमे तामिळनाडू (3818) आणि महाराष्ट्राचा (1113) क्रमांक आहे.
गतवर्षी संयुक्त राष्ट्राने केलेल्या सर्वेक्षणानुसार, दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर केल्यास त्यांच्या वाचण्याची शक्यता 42 टक्क्यांनी वाढते. राज्यांनी सीटबेल्ट न वापरल्याने झालेल्या अपघाती मृतांचा आकडाही दिला आहे. यानुसार 2016 मध्ये एकूण 2638 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील अपघाती मृतांची संख्या सर्वात जास्त असून एकूण 2741 जणांनी आपला जीव गमावला आहे.
हे आकडे धक्कादायक असले तरी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्वच अपघातांची यामध्ये नोंद झाली असावी याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे हे कागदावरील आकडे असले, तरी वस्तुस्थितीत हा आकडा खूप मोठा असू शकतो.
2016 मध्ये एकूण 1.51 लाख रस्ते अपघात झाले आहेत. 2015 मध्ये हा आकडा 1.46 लाख इतका होता. मृत्यूमुखी पडणा-यांमध्ये 18-45 वयोगटातील व्यक्तींची संख्या जास्त आहे. गतवर्षी रस्ते अपघातावर बोलताना केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आणीबाणीची परिस्थिती असल्याचं सांगितलं होतं.