मुंबई : आर्थिक व्यवहार, सर्वसमावेशक विकास, पायभूत सुविधा, ई-गव्हर्नन्स या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्राचा केंद्राकडून गौरव करण्यात आला. नवी दिल्ली येथे झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हे पुरस्कार स्वीकारले.‘स्टेट आॅफ द स्टेट्स कॉन्क्लेव २०१६’ चे आयोजन शनिवारी नवी दिल्लीत करण्यात आले होते. या वेळी महाराष्ट्राला विविध श्रेणीत सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल चार पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी विविध श्रेणीतील पुरस्कार स्वीकारले, तर अर्थव्यवस्थेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते स्वीकारला. या वेळी ज्येष्ठ पत्रकार अरुण पुरी, तसेच विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, सचिव आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)