Maharastra Political Crisis: अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तासंघर्षावरील निकालाचा तो दिवस उजाडणार आहे. सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागणार आहे, अशी माहिती मिळत आहे. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचुड यांनी आज न्यायलयाच्या कामकाजावेळी हे संकेत दिले आहेत. दरम्यान, 16 आमदारांना अपात्र ठरवलं किंवा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे आला तर काय होणार, यावर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (narhari zirwal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नरहरी झिरवळ म्हणाले, त्यावेळी जो मी निर्णय दिला, मी दिलेला निर्णय कुठल्याही राजकीय आकसापोटी दिलेला नव्हता. सभागृह सार्वभौम आहे, ते घटनेवर चालतं. त्या पद्धतीने मी योग्य तोच निर्णय दिला होता. मला विश्वास आहे की, न्यायदेवता सुद्धा माझ्या निर्णयावर शिक्कामोर्तब करेल. सुप्रीम कोर्टाने निर्णयाचा अधिकार विधीमंडळाला घ्यायला सांगितला, तर तो मलाच द्यावा लागेल, कारण मीच त्यावेळी तत्कालीन अध्यक्ष होतो. आता मी अध्यक्ष नसलो तरी तिथल्या प्रक्रियेत एका संविधानिक पदावर आहे, असं झिरवळ म्हणाले.
ते पुढे म्हणतात, माझ्यासमोर जर निकाल देण्याची स्थिती आली, तर माझ्यासमोर एवढ्या दिवस झालेला युक्तीवाद आहे. मी घटनेला अनुसरुनच निर्णय दिला होता, त्यामुळे त्यात बदल करण्याचे काही कारण नाही. न्यायालय निर्णय घेणार की नाही? यावर बोलताना झिरवळ म्हणाले की, एकाद्या कायदेशीर प्रक्रियेबाबात सभागृहात तोडगा निघत नसेल तर त्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून सुप्रीम कोर्ट आहे. कारण हा प्रश्न केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, असंही झिरवळ म्हणाले.
येणारा निर्णय हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादीत असणार नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने जरी निर्णय घेतला तरी कोर्ट 16 आमदारांना अपात्र ठरवेल किंवा तो माझ्याकडे आला तरीदेखील 16 आमदार अपात्र ठरतील. याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना विश्वास आहे, तर मलाही विश्वास आहे की माझ्याकडेच याचा निर्णयाचा अधिकार येईल. सरकार स्थिर व्हायला पाहिजे, जनता विविध कारणांनी होरपळून निघाली आहे, असंही नरहरी झिरवळ म्हणाले.