मुंबई : अयोध्या येथील राम मंदिराच्या उभारणीसाठी शरयू नदीच्या तिरावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब शनिवारी रात्री महाआरती केली असतानाच, मुंबई शहर आणि उपनगरातही शिवसेनेकडून आयोजित महाआरतीमुळे मुंबापुरी दुमदुमली.
शिवसेनेच्या शाखांसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात ठिकठिकाणी सेनेकडून आयोजित महाआरतीला मुंबईकरांनी प्रतिसाद दिल्याचे चित्र होते. मुंबईत सर्व ३६ विधानसभा क्षेत्रांत २४ ठिकाणी हजारो शिवसैनिकांनी महाआरतीचा घंटानाद करून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शिवसैनिकांनी वातावरण निर्मिती करून, महाआरतीवेळी मंदिर परिसरात सजावट, विद्युत रोषणाई केली होती.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या अयोध्या वारीची घोषणा केली आणि शिवसैनिक कामाला लागले. राज्यासह मुंबईत ठिकठिकाणी महाआरतीचे आयोजन करण्यात आले. खासदारांसह आमदार आणि नगरसेवकांसह शिवसेना कार्यकर्त्यांनी यात हिरिरिने सहभाग नोंदविला. शनिवारी सकाळीच उद्धव ठाकरे अयोध्येला रवाना झाले. शरयू नदीच्या काठावर उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती होत असतानाच, मुंबईतही सर्वत्र महाआरतीचा नाद दणाणू लागला. विलेपार्ले पूर्व कोलडोंगरी, शिवाजी चौक येथे शिवसेना विभाग क्रमांक ४ व ५च्या वतीने राम मंदिर निर्मितीसाठी शिवसेनेतर्फे महायज्ञ करण्यात आला.
प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात झालेल्या महाआरतीला राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते, खासदार विनायक राऊत, शिवसेना सचिव आदेश बांदेकर उपस्थित होते. शिवसेना विभाग क्रमांक १ तर्फे आमदार विलास पोतनीस यांच्या मार्गदर्शनाखाली दहिसर व बोरीवली विधानसभा क्षेत्रात तीन ठिकाणी महाआरतीचे आयोजन करण्यात आले.
शिवसेना विभाग क्रमांक २ तर्फे विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली कांदिवली पश्चिम एसव्ही रोड येथील राम मंदिरात, मालाड पश्चिम सोमवार बाजार येथील राम मंदिर आणि कांदिवली पूर्व, आकुर्ली रोड येथील शिवसेना शाखा क्रमांक २४ समोर या तीन ठिकाणी सायंकाळी ६ ते ९ या वेळी महाआरती आयोजित केली होती. शिवसेना विभाग क्रमांक ३ तर्फे आमदार सुनील प्रभू यांनी आरे चेक नाका, सर्व्हिस रोडवरील पंचमुखी हनुमान मंदिरात महाआरतीचे आयोजन केले होते. खासदार गजानन कीर्तिकर यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. दिंडोशी, गोरेगाव, जोगेश्वरी पूर्व येथील तीन विधानसभेतील शिवसैनिक व महिला आघाडीने श्रीरामाचा जल्लोष करत, मिरवणुकीत व बाइक रॅलीत सहभागी झाले होते.
आमदार अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना विभाग क्रमांक ४ व ५ वांद्रे ते जोगेश्वरी येथे महाआरती, विलेपार्ले पूर्व शिवाजी चौकात महाआरती व महायज्ञ आयोजित करण्यात आला होता. या वेळी माजी नगरसेवक शशिकांत पाटकर यांनी ‘हर हिंदू की यही पुकार, पहिले मंदिर फिर सरकार’ असा मथळा लिहिलेल्या सुमारे पन्नास हजार आरती पुस्तकांचे वितरण केले. मुंबईत ठिकठिकाणी झालेल्या महाआरतीत हिंदुत्ववादी संघटना, धार्मिक संघटना, वारकरी संप्रदाय, आध्यात्मिक मंडळ, इतर संघटना सहभागी झाल्या होत्या.