लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महारेराने रायगड जिल्ह्यातील घर खरेदीदारांना द्यावयाच्या नुकसानभरपाईपोटी ७४ प्रकरणांत १५ कोटी ११ लाखांचे वाॅरंट्स जारी केले होते. यापैकी ६.७७ कोटींच्या २७ प्रकरणांतील वसुलीसाठी पनवेल तहसीलदार कार्यालयाने २० जानेवारी रोजी लिलाव जाहीर केला आहे. महारेराकडे घर खरेदीदारांच्या विकासकांबाबत तक्रारी येतात. यावर सुनावणी होऊन भरपाई देण्याचे आदेश विकासकांना दिले जातात. विकासकांनी रक्कम दिली नाही तर ती वसूल करून देण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाची भूमिका असते.
जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयांना असतात. म्हणून महारेराकडून असे वाॅरंट्स संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले जातात. दरम्यान, हे लिलाव रायगड जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार आणि तहसीलदार, पनवेल व त्यांच्या टीमच्या प्रयत्नाने शुक्रवारी पनवेलच्या तहसील कार्यालयात होणार आहेत. महारेराने जारी केलेल्या वाॅरंट्सची व्यवस्थित अंमलबजावणी होऊन घर खरेदीदारांना दिलासा मिळावा, यासाठी सुरू केलेल्या पाठपुराव्याला मिळणारे हे पहिले यश आहे.
- महारेराने जारी केलेल्या वाॅरंट्सचा आढावा घ्यायला सुरुवात केली.
- वाॅरंट्सची वसुली व्हावी, यासाठी राज्यातील १३ जिल्हाधिकारी कार्यालयांना पत्रे पाठविली.
- रायगड जिल्ह्यातील १५ कोटी ११ लाखांच्या ७४ प्रकरणांचा समावेश होता.
- ६ कोटी ७७ लाखांच्या २७ प्रकरणी हा लिलाव होणार आहे.