- मोसीन शेख
मुंबई : नात्या-गोत्याचं राजकरण महाराष्ट्राला काही नवीन नाही. त्यातच आता चर्चा होती ती, राज ठाकरेंनी वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार दिला नसल्याची. मात्र उमेदवार न देऊन आदित्य ठाकरेंना अप्रत्यक्षरीत्या राज ठाकरे यांनी मदत केल्याची चर्चा सुरु असतानाचं, मनसेच्या वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांच्या हातात शिवबंधन बांधून उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत प्रवेश करून घेतला. त्यामुळे शिवसेनेने मनसेला मुंबईत जबरदस्त धक्का दिला असल्याचे बोलले जात आहे.
ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरत असून, मनसेनं जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीतही राज ठाकरेंनी वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार दिला नाही.त्यामुळे आदित्य यांना एकप्रकारे राज ठाकरे यांनी पाठींबा दर्शवला असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे ठाकरे घराण्यात कितीही मतभेद असले तरी कठीण प्रसंगात ते एकत्र येत असल्याचे पुन्हा पहायला मिळाले होते.
मात्र एकीकडे ही चर्चा सुरु असतानाचं, मनसेच्या वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची बातमी आली. तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नितीन नांदगावकर यांनी पक्षाला दिलेली सोडचिठ्ठी हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मनसेच्या पहिल्या दोन्ही याद्यांमध्ये नितीन नांदगावकर यांच्या नावाचा समावेश नसल्याने त्यांनी 'मनसे'ला जय महाराष्ट्र केलं असल्याचे बोलले जात आहे.
आदित्य यांचा विजयाचा मार्ग सुकर व्हावा म्हणून राज ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवार दिला नसल्याचे बोलले जात होते. मात्र त्याच राज ठाकरेंचा खंदे समर्थक समजले जाणारे नितीन नांदगावकर यांना शिवसेनेने फोडले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंसाठी 'मनसे'नं मतदारसंघ सोडला मात्र त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी 'राज' समर्थक फोडला असल्याची चर्चा पहायला मिळत आहे.