अकोट (जि. अकोला), दि. २0-: शहरातील सोनू चौक परिसरातील झी महासेल या प्रतिष्ठानाला २0 फेब्रुवारीला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये दुकानातील साहित्य जळून खाक झाल्याने ८ ते १0 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यावेळी आकोट, अकोला, अंजनगाव, तेल्हारा इत्यादी ठिकाणच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली. शहरातील अत्यंत वर्दळीच्या सोनू चौकाजवळील एका इमारतीमध्ये बँक ऑफ इंडिया शाखा आहे. या इमारतीमध्ये पहिल्या माळ्यावर गणेश अजाबराव ताठे रा. उज्ज्वलनगर अकोट यांचे झी महासेल प्रतिष्ठान आहे. या ठिकाणी घरगुती वापराच्या वस्तू, खेळणी, ज्वेलरी साहित्य, सौंदर्य प्रसाधने, कपडे तसेच इतर साहित्य विक्रीस ठेवण्यात आले होते. सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास अचानक या प्रतिष्ठानामधून धूर व आगीचे लोट उठायला लागले. घटनेची माहिती तत्काळ नगर परिषदेच्या अग्निशमन दल व पोलीस स्टेशनला देण्यात आली. अकोट व इतर ठिकाणचे अग्निशमन दल पोहोचेपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. आगीच्या प्रचंड ज्वाळा इमारतीच्या खिडकीतून उठत होत्या. दरम्यान अकोट, अकोला, अंजनगाव, तेल्हारा इत्यादी ठिकाणच्या अग्निशमन दलाच्या बंबांच्या मदतीने ही आग तब्बल चार तासांनी आटोक्यात आली; परंतु संपूर्ण साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने ८ ते १0 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सकाळची वेळ असल्याने मार्गावरील वर्दळ कमी होती, मात्र बघ्यांची मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, तहसीलदार विश्वनाथ घुगे, ठाणेदार सी.टी. इंगळे, नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे, मुख्याधिकारी गीता ठाकरे, नायब तहसीलदार राजेश गुरव, पोलीस उपनिरीक्षक शरद माळी, नगर परिषदेचे पदाधिकार्यांनी घटनास्थळ गाठले होते. ही भीषण आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. बँकेतील साहित्य हलविलेसोमवारी झी महासेलला लागेल्या आगीनंतर तळमजल्यावर असलेल्या बँक ऑफ इंडिया शाखेतील महत्त्वपूर्ण कागदपत्रे, रोख रक्कमसह इतर साहित्य तत्काळ हलविण्यात आले. बँकेच्या वर लागलेल्या आगीमुळे अग्निशमन दलाने आगीवर प्रचंड प्रमाणात पाण्याचा मारा केला. यामुळे बँकेत आग विझल्यानंतर मोठय़ाप्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे बँकेचे व्यवहार दिवसभर बंद होते.
अकोटात आगीमध्ये महासेल खाक!
By admin | Published: February 21, 2017 1:51 AM