महायुतीतून भाजपाची पहिली यादी आली आहे. मविआमध्ये जागावाटपावरून आघाडी तुटण्यापर्यंत ताणली गेली आहे. अशातच बच्चू कडू, संभाजीराजे आणि राजू शेट्टी यांनी बनविलेली तिसरी आघाडी महायुती आणि मविआतील बिघाडीवर लक्ष ठेवून असल्याचे कडू यांनी स्पष्ट केले. त्यांच्यातील चांगले लोक महाशक्तीमध्ये घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचे उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. आता तिसऱ्या आघाडीमध्ये कोणाला उमेदवारी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुती, मविआत तिकीट न मिळाल्याने नाराज असलेले नेते फोडण्याची तयारीही कडू यांनी दर्शविली आहे.
आज राजू शेट्टी, संभाजीराजे छत्रपती आणि आम्ही सगळे बसून चर्चा करणार आहोत. ज्या आमच्या मजबूत जागा आहेत त्या जागांवरील यादी आज किंवा उद्या जाहीर करणार आहोत. ही जवळपास १०० लोकांची सगळी यादी असेल. यानंतर पुढच्या याद्या जाहीर होतील. आघाडी आणि युतीमध्ये काय बिघाडी होते यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. चांगले नेते असतील तर त्यांना महाशक्तीमध्ये घेणार आहोत. महायुती किंवा आघाडीचे कोणतेही मोठे नेते असतील तरी त्यांच्याविरोधात उमेदवार देणार असे स्पष्ट करत कडू यांनी आम्हाला कसली आलीय भीती, असे म्हटले आहे.
मनोज जरांगे सोबत येणार की नाही तसेच जर सोबत नाही आले तर काय याबाबत कोणती भूमिका घ्यायची याची जबाबदारी संभाजीराजेंवर सोपविली असल्याचे कडू यांनी स्पष्ट केले. भाजप आपल्याच उमेदवाराला बकरा करू लागला अशी सध्या स्थिती आहे. अमरावती जिल्ह्यात भाजपा ठेवायचीच नाही अशी राणा कुटुंबाने व्यवस्था केली आहे. प्रवीण तायडे हा नवा कार्यकर्ता आहे. अनेक गुन्हे दाखल झालेले जुने कार्यकर्त्यांना डावलून नव्या कार्यकर्त्याला तिकीट दिले आहे. केंद्रात सत्ता असताना नवखे कार्यकर्ते देणे ही भाजपची हार आहे. अचलपूरमध्ये भाजपा आणि काँग्रेस एकत्र होऊन बच्चू कडू विरोधात लढणार आहे, असा दावा कडू यांनी केला आहे.