धर्मराज हल्लाळे,
नांदेड- मजबुरी का नाम महात्मा गांधी नव्हे तर विश्वमान्यतेमुळे गांधींचे नाव पदोपदी घेणे ही पुढाऱ्यांची अन् सरकारची मजबुरी आहे़ त्यामुळेच कधी चष्मा तर कधी चरख्याचे वलय स्वत:ला चिकटविण्याचा प्रयत्न होतो़ चरख्यासमोर बसण्याची नक्कल केली जाते़ जणू प्रत्येक ठिकाणी स्वत:चे छायाचित्र बघण्याचा छंदच पंतप्रधानांना जडला आहे, अशी टीका महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली़ खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडर तसेच डायरीवरील महात्मा गांधींचे छायाचित्र हटवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चरखा चालवित असलेले छायाचित्र प्रसिद्ध झाले. गांधीजींचे छायाचित्र न छापण्याची ही पहिली वेळ नाही़ यापूर्वीही अनेकदा कॅलेंडर व डायरीवर गांधीजींचे छायाचित्र नव्हते, असा पलटवार भाजपाकडून करण्यात आला़ त्यावर तुषार गांधी म्हणाले, यापूर्वीही कॅलेंडर व डायरीवर गांधीजींचे छायाचित्र नव्हते, ही वस्तुस्थिती आहे़ परंतु त्यावेळी त्या-त्या काळातील पंतप्रधान वा अन्य कोणाचे छायाचित्र त्यावर छापलेले नव्हते़ शिवाय गांधीजींच्या चरखा चालवत असलेल्या छायाचित्राची नक्कल करणे म्हणजे स्वत:ची प्रतिमा बापूंच्या वलयात उजळवून घेण्याचा प्रकार आहे. हरियाणाच्या भाजपा मंत्र्याने महात्मा गांधींपेक्षा मोदी हे मोठे ब्रँड आहेत, असे वादग्रस्त विधान केले़ त्यावर गांधी म्हणाले, पंतप्रधान मोठे ब्रँड होवू शकतील़ मात्र गांधीजी हे ब्रँड नव्हे, आयकॉन आहेत़ ज्यांना ब्रँड व आयकॉनमधील भेद कळत नाही, ते बाष्कळ बडबड करीत आहेत.।त्यांच्या मनात नथुरामबापूंच्या विश्वमान्यतेमुळे पुढाऱ्यांना चरख्याआड लपावे लागते़त्यांच्या हाती चरखा, झाडू असला तरी ज्यांच्या मनात नथुराम आहे, ते गांधी विचार नष्ट करू पाहत आहेत़ गांधीजींची प्रतीके बळकवायची, छायाचित्रासमोर नतमस्तक व्हायचे, हा बनाव आपण पाहिल्याचे ते म्हणाले.