आज मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या समारोप सभेत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीमधील घटक पक्षांचे वरिष्ठ नेते सहभागी झाले होते. या नेत्यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपाच्या हुकूमशाही प्रवृत्तीवर घणाघाती टीका केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांविरोधात भारत छोडो चा नारा दिला होता. आता भाजप छोडो नारा देण्याची आवश्यकता असल्याचं आवाहन केलं.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, आज ज्यांच्या लोकांच्या हातात सत्ता आहे त्यांनी महिला, शेतकरी, कामगार, आदिवासी, दलितांनी जे आश्वासन दिली होती ती पूर्ण केली नाहीत. आश्वासन देऊन जनतेला फसवले त्यांना हटवण्याची गरज आहे. मोदींची गॅरंटी खोटी आहे, ती चालणार नाही. मुंबईतूनच महात्मा गांधी यांनी छोडो भारतचा नारा दिला होता आज छोडो भाजपा हा नारा दिला पाहिजे.
यावेळी नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीवरही शरद पवार यांनी टीका केली. शरद पवार म्हणाले की, देशातील परिस्थितीत बदल घडवून आणण्याची गरज आहे. मोदींच्या गॅरंटीबाबत मागच्या दिवसांपासून सातत्यानं ऐकावं लागत होतं. मात्र हे आजपासून ऐकावं लागणार नाही. त्यासाठी निवडणूक आयोगाचे आभार मानले पाहिजेत. आता मोदींची गॅरंटी चालणार नाही, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.