मुंबई : लोकमत समूहातर्फे सन्मानपूर्वक प्रदान केल्या जाणाऱ्या महाराष्ट्रीयन आॅफ द ईअर पुरस्कारांसाठीचे ज्युरी मंडळ जाहीर झाले असून त्यात विविध क्षेत्रांतल्या अनेक मान्यवरांचा समावेश आहे. लोकसेवा-समाजसेवा, विज्ञान तंत्रज्ञान, परफॉर्मिंग आर्ट, कला, क्रीडा, रंगभूमी, चित्रपट, इन्फ्रास्ट्रक्चर, बिझनेस, प्रशासन आणि सर्वांच्या उत्सुकतेचे क्षेत्र राजकारण अशा १४ कॅटेगरीतील नामांकने आॅनलाइनवर जाहीर झाली आहेत.ज्युरी मंडळात देशाचे माजी गृहमंत्री व राज्याचे माजी मुख्यमंत्री, सुशीलकुमार शिंदे अग्रभागी आहेत. महाराष्ट्र व देशाच्या राजकारण, समाजकारणात दूरगामी छाप पाडणारे राज्यातले काँग्रेस पक्षाचे ते अत्यंत प्रभावी नेते आहेत. शिपाई ते देशाचे गृहमंत्री असा त्यांचा विलक्षण प्रभावी प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलेला आहे. २० वर्षे खासदार, अवजड उद्योग मंत्रालय व नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे खा. प्रफुल्ल पटेल दुसरे ज्यूरी असतील. विमान वाहतूक क्षेत्रात त्यांच्या काळात देशभरातील विमानतळे एकसारखी दिसावीत, सर्व सोयींनी युक्त व्हावीत यासाठी झालेल्या प्रयत्नांचे फळ आता दिसू लागले आहे. टाटा इन्स्टिट्यूट आॅफ फंडामेंटल रिसर्च मधील निवृत्त शास्त्रज्ञ व ‘पद्मभूषण’चे मानकरी प्रा. शशिकुमार चित्रे ज्यूरीत आहेत. पदव्युत्तर शिक्षण परदेशात घेतल्यानंतर आवर्जून मायदेशी परतलेले आघाडीचे खगोलभौतिक शास्त्रज्ञ म्हणून ते ओळखले जातात. प्रज्ञावान विद्यार्थ्यांनी मुलभूत विज्ञानाकडे वळावे यासाठी त्यांनी केलेले कार्य गौरवास्पद आहे. मुंबई विद्यापीठ आणि अणूउर्जा आयोगाच्या मुंबई केंद्राचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत.नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रवर्तक असणाऱ्या मेधा पाटकर या वर्षीच्या आणखी एक ज्यूरी आहेत. त्यांना सामाजिक कार्याचा वसा त्यांच्या मात्यापित्यांकडून मिळाला असून पर्यावरण, सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य जगभर प्रसिध्द आहे. आपल्या स्पष्ट व सडेतोड भूमिकेने जनसामान्यांच्या बाजूने निर्णय घेण्यास त्यांनी त्या त्या सरकारांना अनेकवेळा भाग पाडले आहे.आरपीजी इंटरप्रायेजस ग्रूपचे चेअरमन हर्ष गोयंका हे वीजनिर्मिती, वितरण, माहिती तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, औषध निर्मिती, वृक्ष लागवड आणि टायर उत्पादन या क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या कंपन्यांचे प्रमुख आहेत. इंडियन मर्चंट चेंबर्स, फिक्की, नॅशनल इन्स्टीट्यूट आॅफ इंडस्ट्रीयल इंजिनियरिंग या संस्थांमध्ये ते सक्रीय असून नॅशनल गॅलरी आॅफ मॉडर्न आर्टचे सल्लागार सदस्य आहेत.यावर्षीच्या ‘पद्मश्री’चे मानकरी अॅड. उज्वल निकमही ज्युरीत सहभागी आहेत. २६/११ मधील एकमेव जीवंत आरोपी कसाबला फासावर चढविण्यापर्यंतचा खटला त्यांनी यशस्वीपणे लढला. सध्या डेव्हिड कोलमनची साक्ष घेण्यात व्यस्त आहेत. सलग तीनवर्षे तीन वेगवेगळ्या चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे देशातले एकमेव दिग्दर्शक म्हणून ज्यांचा गौरवाने उल्लेख होतो ते मधूर भांडारकर यावर्षीच्या ‘पद्मश्री’चे मानकरी असून ते ही ज्युरी सदस्य आहेत. महिलांना मध्यवर्ती ठेवून चित्रपट बनविणारी ही अफलातून व्यक्ती कधीकाळी व्हिडीओ कॅसेट लायब्ररी चालवत होती. चित्रपट, रंगभूमी या कॅटेगिरीज् मधील नामांकने मिळविणाऱ्यांना भांडारकर ज्यूरी असल्याचा आनंद असणार आहे.हिवरेबाजार या अहमदनगर जिल्ह्यातल्या छोट्याश्या गावाचे सरपंच पोपटराव पवार हे आणखी एक ज्यूरी. रणजी खेळाडू ते राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेले सरपंच असा त्यांचा विलक्षण प्रवास आहे. ग्रामीण भागात जमिनीखालील पाण्याची पातळी कशी वाढवली हे पाहण्यास जगभरातून लोक येतात. आपले गाव पहायला येणाऱ्यांना तिकीट लावणारी ही देशातली एकमेव ग्रामपंचायत. पोपट पवार ज्यूरीत आल्याने एक वेगळे सामाजिक परिमाण या ज्यूरी मंडळाला लाभले आहे. अर्थशास्त्र आणि विधी यात पदवी मिळणाऱ्या खिलाडू वृत्तीच्या अयाज मेमन या व्यक्तीमत्वाने ३३ वर्षे क्रीडा पत्रकारितेत घालवली आहेत. समीक्षक, विश्लेषक, समालोचक आणि क्रिकेट, टेनिस शिवाय अन्य विविध खेळांमध्ये स्वत:ची ठाम मते मांडताना खेळाला प्रोत्साहन मिळाले पाहिजे म्हणून विपूल लेखन त्यांनी केले. अनेक पुस्तकांची निर्मिती त्यांनी केली आहे. अशा मान्यवरांच्या ज्यूरी मंडळामुळे ज्यांना नामांकने मिळाली आहेत. त्यांच्यासह सगळ्यांच्याच मनात उत्सूकता निर्माण झाली आहे. लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द ईअर पुरस्कारांची नामांकने www.lokmat.com वर जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील व जगभरातील लोकमत वाचकांसाठी पहिल्यांदाच हा प्रयोग होत आहे. तर चला आॅनलाइनवर आणि निवडा आपले विजेते..!
लोकमत करणार महाराष्ट्र रत्नांचा गौरव !
By admin | Published: March 18, 2016 4:01 AM