Shinde Fadnavis vs Mahavikas Aaghadi: राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. काल दिवसाची सुरुवात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील जोरदार राड्याने झाली होती. विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तू-तू मैं-मैं झाल्याचं दिसलं. विधान भवनाच्या पायऱ्यांवरच दोन्ही बाजूचे आमदार एकमेकांशी भिडले. त्यानंतर कसेबसे ते प्रकरण शांत झाले. असे असताना आज पुन्हा एकदा मविआच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. तसेच, सभागृहात कामकाजा दरम्यान आदिवासी मंत्रालयाच्या मंत्र्यांनी नीट उत्तर न दिल्याने त्यांचा निषेध म्हणून सभात्याग केला.
"पन्नास खोके, चिडलेत बोके... ओला दुष्काळ जाहीर करा... नाहीतर खुर्च्या खाली करा... महाराष्ट्र के गद्दारों को, जुते मारो सालों को... गुंडगिरी दडपशाहीने विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार्या सरकारचा धिक्कार असो... ईडी सरकार हाय हाय... पैसा आमच्या जनतेचा, नाही कुणाच्या बापाचा... शेतकऱ्यांना वार्यावर सोडणाऱ्या सरकारचा निषेध असो... गद्दार सरकारचा निषेध असो... सातवा वेतन न देणार्या सरकारचा धिक्कार असो... एसटी कर्मचाऱ्यांना वार्यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो... बलात्काऱ्यांचा सत्कार करणार्या सरकारचा धिक्कार असो... अशा गगनभेदी घोषणा देत आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर ईडी सरकारच्या विरोधात विधानभवन परिसरात जोरदार घोषणाबाजी केली.
कुपोषणाच्या मुद्यावर आदिवासी मंत्र्यांकडून आलेल्या असंवेदनशील उत्तराने आम्ही समाधानी नसल्याने आदिवासी मंत्र्यांचा निषेध म्हणून सभात्याग केला, असे माजी मंत्री आणि गटनेते जयंत पाटील यांनी जाहीर केले आणि सर्व आमदारांनी सभात्याग केला. "राज्यातील कुपोषित बालकांचा मृत्यू होत असताना आदिवासी विकास मंत्री योग्य उत्तर देत नाहीत. ते आरोग्य मंत्र्यांकडे प्रश्न ढकलत आहेत मग आरोग्य मंत्र्यांकडे उत्तर असते तर त्यांनी उत्तर दिले असते. मात्र योग्य उत्तर सभागृहात दिले जात नाही, तोपर्यंत आमचे समाधान होणार नाही. त्यामुळे हा प्रश्न राखून ठेवावा", अशी मागणीही जयंत पाटील यांनी सभागृहात केली. हा प्रश्न रेटून नेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीमधील सर्व आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.