वडगाव मावळ : लाॅकडाऊनकाळात आघाडी शासनाने शेतकऱ्यांकडे सपशेल दुर्लक्ष केले.दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. मुख्यमंत्री म्हणतात, मला शेतीतले काही कळत नाही. परंतु, रात्री १ वाजेपर्यंत पोलिसांच्या बदल्या करण्यासाठी जसे लक्ष घालता तसे लक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नावर घाला. 'नाचता येईना म्हणे अंगण वाकडे', असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लावला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने मावळ तालुक्यातील नायगाव येथील पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या नायगाव शीतकरण केंद्रावर शनिवारी सकाळी राज्यव्यापी महाएल्गार आंदोलन होत आहे. दूध दरवाढी हे आंदोलन झाले, यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हा भाजपाचे अध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा दूध संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे, लोणावळच्या नगराध्यक्ष सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, सायली बोत्रे, नितीन मराठे, अविनाश बवरे,गुलाबराव म्हाळस्कर ,दत्तात्रेय शेवाळे, रामविलास खंडेलवाल, बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकरी नसले तरी उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकरी आहेत, त्यांनी तरी शेतकऱ्यांना भावना समजून शेतकरी हिताच्या निर्णयाला प्राधान्य दिले पाहिजे. सध्या कोरोनामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था विस्कटलेली आहे. दूधधंदा हाच शेतकऱ्यांचा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे सरकारने दुधाला प्रति १० रूपये भुकटीला ५० रुपये अनुदान दिले पाहिजे असे आवाहन राज्य सरकारला पाटील यांनी यावेळी केले.
पाटील म्हणाले,महाविकास आघाडीच्या सरकारने लोकहिताचे कोणतेही निर्णय घेतले नाही, कर्जमाफी देण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांना बी बियाणे आणि खते मिळाली नाही, पावसाने ओढ दिल्याने दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. कोरोनाने अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे, जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला वाचविण्यासाठी विशेष अनुदानाची गरज आहे. आतापर्यत केंद्र सरकारने राज्याला मदत केली नाही, अशी गरळ ओकणाऱ्या आघाडी सरकारला केंद्राने मोठे अनुदान दिले आहे. आतातरी राज्य सरकारने कोरोना हद्दपार केले पाहिजे.