मुंबई : अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेविरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गुरुवारी धरणे आंदोलन केले. राज्य सरकारमधील ज्येष्ठ मंत्र्यांसह आघाडीतील नेते, पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोरील आंदोलनात सहभागी होत मलिक यांना आपला पाठिंबा दर्शविला. तसेच केंद्रीय यंत्रणांच्या विरोधात घोषणाबाजी करीत संताप व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उद्योगमंत्री सुभाष देसाई, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, ऊर्जामंत्री नितीन राऊत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री राजेश टोपे, खा. सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीसह काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी केंद्र सरकार, ईडी आणि भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘नवाब मलिक जिंदाबाद- ईडी मुर्दाबाद, मोदी सरकार हाय हाय, महाराष्ट्र लढेगा मोदी हारेगा, महाराष्ट्र ना कधी दिल्लीसमोर झुकला ना कधी झुकणार, आवाज कुणाचा महाविकास आघाडीचा; अशा जोरदार घोषणा व फलक फडकावत मविआच्या नेते, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनी महात्मा गांधी पुतळा परिसर दणाणून सोडला.
केंद्राच्या दडपशाहीविरोधात आघाडी एकत्र लढा देत असून, भाजपला नवाब मलिक यांचा राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले. राज्य सरकार अस्थिर करण्यासाठी ही कारवाई झाली आहे. ज्याच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले त्या केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी भाजपने आंदोलन केले पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.
तर नवाब मलिक यांच्यावरील कारवाई ही राजकीय सूडबुद्धी आहे. अत्यंत खालच्या पातळीवरचे राजकारण देशात सुरू आहे. मंत्र्याला अशा पद्धतीने अटक करणे लोकशाहीला मारक असून, केवळ संशयाच्या आधारावरील या कारवाईने चुकीचा पायंडा पाडला जात असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.
ईडीचा पेपर फुटलाच कसा? - सुप्रिया सुळेईडीची कुठलीही कारवाई होते, तेव्हा महिन्याअगोदरच त्या कारवाईसंबंधीच्या बातम्या बाहेर कशा येतात? दहावीचा एखादा पेपर फुटला की परीक्षा रद्द होते. शिक्षण अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होतात. मग ईडीच्या बातम्या बाहेर पडतात, तेव्हा ईडीचा पेपर फुटल्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न खा. सुप्रिया सुळे यांनी केला. ईडीच्या बातम्या भाजपच्या नेत्यांना कशा मिळतात, याची चौकशी व्हावी, अशी मागणीही केंद्रीय गृहमंत्र्यांकडे करणार असल्याचे सुळे यांनी सांगितले. नवाब मलिक भाजपची पोलखोल करीत आले आहेत. त्यामुळे त्यांना सतत धमक्या मिळत होत्या. मलिक धमक्यांना जुमानत नाही, असे दिसायला लागले तेव्हा त्यांच्यावर खोट्या आरोपांची राळ उठविण्यात आल्याचे सुळे म्हणाल्या.
मलिकांवरील आरोपात तथ्य नाही : जयंत पाटीलकेंद्र सरकारच्या धोरणांना विरोध करणाऱ्यांना टार्गेट करण्याचे काम दोन-अडीच वर्षांपासून सुरू आहे. नवाब मलिक यांच्यावर लावलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही, हे तपशील पाहिल्यावर लक्षात येते. मलिक यांच्यावर याआधी कोणताही गंभीर आरोप झालेला नाही. अशा व्यक्तीवर २०-२५ वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या मालमत्तेवर बोट ठेवून ज्याचा संबंध नाही, अशा व्यक्तीला तुरुंगात टाकणे हे योग्य नाही. तसेच या प्रकरणाचे कनेक्शन अतिरेकी संघटनांशी जोडणे, हा प्रकार जनतेच्या लक्षात आला आहे. राज्यभर या अटकेच्या विरोधात प्रतिक्रिया उमटणार आहेत. मलिक यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याशिवाय कोणतीही कारवाई करण्याची आवश्यकता राष्ट्रवादीला वाटत नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले.