मुंबई - राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला आज दोन वर्षे झाली. दोन वर्षाच्या सरकारच्या कालावधीचे वर्णन करायचे झाले तर आघाडी सरकार फक्त "पुत्र, पुत्री आणि पुतण्या" याभोवतीच फिरणारं असल्याची टीका भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी आज येथे केली. आघाडी सरकारच्या दोन वर्षा निमित्ताने आज प्रदेश भाजपा कार्यालयात भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी हे सरकार म्हणजे तीन पैशांचा तमाशा या नाटकाप्रमाणे तीन पक्षांचा तमाशा असल्याची टीका केली.
आशिष शेलार म्हणाले की, मला कुणावर वैयक्तिक टीका करायची नाही. तसेच आज कोणता आरोप अथवा टीका ही करायचा नाही. आजचा दिवस खऱ्या अर्थाने वेदनांच्या प्रगटीकरणाचा दिवस आहे. असंख्य वेदना महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील जनतेला गेल्या दोन वर्षापासून भोगाव्या लागल्या त्या मांडत आहोत.काही वर्षांपूर्वी तीन पैशांचा तमाशा असं नाटक प्रसिद्ध होतं. हे सरकार म्हणजे तीन पैशांचा तमाशा असंच याचं नाटक आहे. सत्ता संपत्ती मिळविण्यासाठी अमानवी, अमानुष प्रयत्न केला गेला. हे सरकार जनता केंद्रीत होण्यापेक्षा पुत्र, पुत्री आणि पुतण्या याभोवती केंद्रित झालेलं आहे. ही वेदना आम्ही मांडतो आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच अडचण काहीच नाही एखाद्याला आपला पुत्र चांगलं काम करावा, मोठा व्हावा असं वाटतं. त्याच्या नेतृत्वामध्ये पुढचे यश मिळाले पाहिजे. ही पायाभरणी करायला एखाद्याला वाटलं तर त्यात चूक असू शकत नाही. आपला पुत्र राजकारणात स्थिरावला पाहिजे यात चूक नाही, पण राज्यात निर्णय काय घेतले हे पहिले तर महाराष्ट्राची बदनामी झाली असल्याचं दिसतं. राज्याची जगासमोर जी प्रतिमा गेली ती पब,पेग, पार्टी आणि पेग्विन अशीच दुर्दैवी गेली. मग जेव्हा मुंबईकर लोकल ट्रेन सुरु करा असे म्हणत होते तेव्हा पब आणि बार सुरु केले गेले. जेव्हा मंदिर उघडा अशी मागणी झाली तेव्हा मदिरालाय उघडी केली, असे निर्णय पुत्र प्रेमाने झाले असा टोला भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला.
दरम्यान, सुपुत्रीच्या प्रेमापोटी गृहमंत्री पदी अनिल देशमुख यांना बसवले, त्यानंतर महाराष्ट्राची बदनामी करणारे वसुली, मटका किंग, बुकी यांच्यासोबत व्यवहार, पोलीस दलात गटबाजी, बदल्यांमधील भ्रष्टाचार असे चित्र समोर आले. महाराष्ट्राची ही वेदना आहे. पुतण्या प्रेमाने त्यांना पुतण्याला सरकारमध्ये महत्त्वाचे स्थान द्यावे लागले. पुतण्याचे काय उद्योग सांगावे? १ हजार कोटींची बेनामी संपत्तीची माहिती केंद्रीय तपास यंत्रणांनी उघड केली. कुठून आली संपत्ती? सहकारी कारखाना उघडायचा, सरकारकडून जमीन, वीज सगळे सवलतीत मिळवायचे, शेतकऱ्यांकडून पैसा घ्यायचा, पण कारखाना तोट्यात दाखवायचा, बँकेने मग लिलाव करायचा, मग तोच कारखाना पुतण्याने विकत घ्यायचा असे पुतण्याचे नवीन उद्योग समोर आले असं सांगत भाजपाने उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला.