महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्याला मूर्ख बनवण्याचं काम करतंय : देवेंद्र फडणवीसांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 02:50 PM2020-12-25T14:50:54+5:302020-12-25T14:53:36+5:30
आमच्या काळात शेतकऱ्यावर जेव्हा कधी संकट आले तेव्हा आम्ही त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहिलो
पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करणार असल्याचे बोलले होते. त्यावेळी नुकसान झालेल्या भागाला प्रत्यक्ष भेट देऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा देखील घेतला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार तर मुख्यमंत्र्यांच्याही पुढे गेले. त्यांनी बागायतदारांना दीड लाख रुपयांची मदत देऊ असे घोषित केले होते. मात्र प्रत्यक्षात तसं काही झालं नाही.याचमुळे महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्याला मूर्ख बनवण्याचं काम करत आहे , अशी घणाघाती टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलन सुरु असताना राज्यात भाजपाकडून संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर
देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथील मांजरीमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांची माहिती देत त्याचे महत्व पटवून दिले.
फडणवीस म्हणाले, 'आम्ही केलेल्या कर्जमाफीला नावे ठेवत राज्य सरकारने कर्जमाफीची योजना तयार केली. पण त्याचा फारसा उपयोग शेतकऱ्याला झालेला नाही. मात्र आमच्या काळात जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा जवळपास ४२ लाख शेतकऱ्यांना झाला होता. मात्र यांची कर्जमाफी २९ लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली. आम्ही प्रामाणिक शेतकऱ्यांना इन्सेंटिव्ह दिला होता. यांनी मात्र प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ठेंगा दाखवला.
आमच्या काळात शेतकऱ्यावर जेव्हा कधी संकट आले तेव्हा आम्ही त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहिलो. पण आज सरकार शेतकऱ्याचा विचार कऱणारे,त्यांची भूमिका मांडणारे असे कुणीही दिसत नाही. भाजपाने मागील पाच वर्षात सातत्याने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले होते, असहा शब्दात फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
यामुळे फडणवीसांनी व्यक्त संताप...
शेतकऱ्यांना सहा आणि आठ हजार रुपये घोषित केले आणि तेदेखील पोहोचले नाही. शेतकऱ्याला मूर्ख बनवण्याचं काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे,” असा संताप फडणवीसांनी व्यक्त केला.