अजित पवार गुलाबी सरडा, संजय राऊतांचा घणाघात; युगेंद्र पवारांनी घेतला आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 03:30 PM2024-08-16T15:30:32+5:302024-08-16T15:31:23+5:30
मुंबईतील महाविकास आघाडीच्या मेळाव्यात संजय राऊतांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
मुंबई - येत्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून महाविकास आघाडीकडून पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यातून उद्धव ठाकरे, शरद पवार आणि इतर नेत्यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला. त्याचवेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सरडा म्हणून उल्लेख करत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं. मात्र राऊतांनी अजित पवारांसाठी वापरलेल्या शब्दावर युगेंद्र पवार यांनी जाहीर आक्षेप घेतला.
आजच्या मेळाव्यात सुप्रिया सुळेंकडे पाहत संजय राऊत म्हणाले की, सुप्रिया सुळे या महाराष्ट्राची लाडकी बहीण आहे, या बहिणीसाठी महाराष्ट्र लढला. या बहिणीसाठी बारामतीत महाराष्ट्र लढला आहे. तुमचे जे लाडके भाऊ आहेत त्यांनी रंग बदलला. ते आता पिंक झालेत. सरडा रंग बदलतो पण अचानक गुलाबी कसा होऊ शकतो. आता हा गुलाबी सरडा बारामती सोडणार असं मी ऐकलं आहे. कुठे जाणार हे माहिती नाही. परंतु गुलाबी रंग हा महाराष्ट्राला धार्जिणा नाही. आपला रंग भगवा आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच बाजूच्या तेलंगणा राज्यात केसीआर यांचा गुलाबी रंग होता ते पराभूत झाले. पिंक कधीही राजकारणात जिंकत नाही. एकतर भगवा रंग जिंकतो किंवा तिरंगा..तिरंग्याच्या रक्षणाला भगवा रंग आहे. बाळासाहेब नेहमी सांगायचे, तिरंग्याचे रक्षण जर कुणी करेल तर तो भगवा. आम्ही हे रक्षण करतोय. त्यामुळे पिंकची काळजी नाही तो रंग आता गेला. आता आपल्याला रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी...मशाल बुडाला आग लावायला आहेच असंही संजय राऊतांनी म्हणत अजित पवारांवर नाव न घेता घणाघात केला.
युगेंद्र पवारांनी घेतला आक्षेप
दरम्यान, मी व्यासपीठावर नव्हतो. मी खाली बसलो होतो. संजय राऊत काय बोलतील त्यावर आम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही. सगळेच आम्हाला आवडतं असं नाही. शेवटी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. राजकारण बाजूला ठेवले तर ते माझे काका आहेत. सगळेच टीका करतात परंतु प्रत्येकाची टीका आवडतेच असं नाही असं सांगत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनी संजय राऊतांच्या टीकेवर आक्षेप घेतला.