यवतमाळ : जिल्ह्यातील नेमकी परिस्थिती काय आहे व कुठल्या समस्या प्राधान्याने सोडवाव्या लागतात, हे जाणून घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी रात्री व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे विदर्भातील मंत्री, आमदारांची बैठक घेतली. यात जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या आमदारांनी थेट मुख्यमंत्र्यांपुढे जिल्ह्याच्या समस्या मांडल्या. त्यावर उपाययोजना करण्याचे तत्काळ निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. विदर्भासह राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री तसेच महाविकास आघाडीचे विदर्भातील आमदार यांची संयुक्त बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे घेण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक आमदाराला त्यांच्या काय समस्या आहे, कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे याची विचारणा केली. यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, आमदार डॉ.वजाहत मिर्झा, आमदार इंद्रनील नाईक यांनी या बैठकीत जिल्ह्यातील समस्या मांडल्या.आमदार डॉ.वजाहत मिर्झा यांनी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयातील काही उणिवा बैठकीत ठेवल्या. मेडिकल कॉलेजमध्ये अमरावती, वाशिम, नांदेड या जिल्ह्यासह लगतच्या तेलंगणा राज्यातूनही रुग्ण उपचाराला येतात. रुग्णांची संख्या पाहता येथील साधन सामुग्री कमी पडत आहे. काही पदांची नव्याने निर्मिती तर काही रिक्त पदे भरण्याबाबतचा प्रस्ताव त्यांनी मुख्यमंत्र्यांपुढे ठेवला. याला ना.राठोड व आमदार इंद्रनील नाईक या दोघांनीही सहमती दर्शविली. तर आमदार इंद्रनील नाईक यांनी खत टंचाईचा मुद्दा मांडला. पुसद व लगतच्या परिसरात खताचा पुरवठा करण्यासाठी वाशिम येथे रॅक पॉर्इंट देण्यात यावा, अशी मागणी केली. याला पालकमंत्र्यांनीसुद्धा अनुमोदन दिले. हा प्रश्न तत्काळ सोडविण्यात यावा, असे निर्देश बैठकीतूनच संबंधितांना मुख्यमंत्र्यांनी दिले.याशिवाय जिल्ह्यातील शेतकºयांची, पीक विमा, पीककर्ज वाटप याचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. लॉकडाऊनबाबत काय निर्णय घ्यावा यावरही स्थानिक मंत्री आमदारांचे मत घेतले. यावर आमदार इंद्रनील नाईक व आमदार डॉ.वजाहत मिर्झा यांनी लॉकडाऊन करण्यात यावा, असे सूचविले. आता प्रत्येक महिन्यात आढावा घेतला जाईल, अशीही ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. याशिवाय अधिवेशनाच्या आयोजनाबाबतही निर्णय होईल, असे सांगितले. सरकारला पाच वर्षे धोका नाहीराज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला पाच वर्ष धोका नाही. सर्वांच्या सूचना व अपेक्षांना योग्य न्याय देवू, हे सरकार पाच वर्ष यशस्वीरित्या काम करेल असा विश्वास या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या शेतकरी, कोरोनाबाबतच्या समस्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 2:46 PM