मुंबई - विधानसभा निवडणुकीत महायुतीने २३० हून अधिक जागा मिळवून बहुमतासह राज्यात सरकार बनवलं आहे. त्यातच मविआचे अनेक खासदार भाजपाच्या संपर्कात आले आहेत. विशेषत: शरद पवार गटाचे खासदार भाजपा नेत्यांच्या संपर्कात असल्याने भाजपा पवारांना पुन्हा एकदा धक्का देण्याच्या तयारीत आहे.
याबाबत भाजपा नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, निश्चितपणे मविआचे खासदार-आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. मविआचे खासदार विशेषत: शरद पवारांचे खासदार आहेत तिथे महायुतीचे आमदार निवडून आलेत. विकास त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. पुढील राजकीय भवितव्याचा विचार करत ते हालचाली करत आहेत. केंद्रात भाजपा युतीचं आणि राज्यात भाजपा महायुतीचं सरकार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांचा आग्रह, ज्यासाठी आपण निवडणूक लढवतोय तो विकास त्यातून शरद पवारांच्या पक्षातील खासदार भाजपासोबत येण्याचा विचार करू शकतात असं त्यांनी सांगितले.
तसेच सत्तेच्या माध्यमातून गतीने विकास करता येतो. केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं भक्कम सरकार असल्याने विकास मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षातील असो वा मविआचे खासदार भाजपा नेतृत्वाच्या संपर्कात राहणे स्वाभाविक आहे असंही भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटलं.
दरम्यान, भाजपाचं केंद्रातील सरकार चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांच्या कुबड्यावर उभे आहे. त्या कुबड्या कधीही गळून पडतील अशी भीती त्यांना आहे. त्यामुळे अशाप्रकारे ते प्रयत्न करतायेत. भाजपाला नैतिकता नाही. भाजपाकडून असे प्रयत्न सुरू राहणार आहे. ५० कोटी खोके देऊन कसं आमदारांना गुवाहाटीला पळवलं, राज्यात सरकार बनवले. मी पुन्हा येईन म्हणणारे ईव्हीएमच्या जोरावर परत आलेत. अनैतिक सरकारचे असे प्रयत्न भाजपाचे सुरू राहणार आहेत. महाराष्ट्रातील सरकार मजबूत असले तरी केंद्रातील सरकार मजबूत नाही त्यांना काही खासदारांची गरज लागेल म्हणून ते अशाप्रकारचे प्रयत्न करत असतील परंतु त्यांना यश मिळणार नाही असं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे.