मुंबई - राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या १० जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सागर बंगल्यावर जात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. या बैठकीत महाविकास आघाडीकडून मंत्री छगन भुजबळ, सुनील केदार आणि खासदार अनिल देसाई उपस्थित होते. या बैठकीनंतर मविआ नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
छगन भुजबळ(Chhgan Bhujbal) म्हणाले की, राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याची प्रथा आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न केले. आमच्यात चर्चा सकारात्मक झाली. आम्ही एक प्रस्ताव दिला त्यावर त्यांनीही प्रस्ताव दिला. आमच्यात हसत खेळत चर्चा झाली. ते त्यांच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील. आम्ही ३ वाजेपर्यंत वाट पाहू. आमच्या प्रयत्नांना यश मिळेल. या बैठकीत आम्ही जो प्रस्ताव दिला त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला प्रस्ताव दिला. सहाव्या जागेसाठी जादाची मते मविआकडे जास्त आहेत. सहावा उमेदवार हा शिवसेनेचा नाही तर महाविकास आघाडीचा आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी कुणीतरी पुढाकार घेणं गरजेचे होते ते आम्ही केले असं त्यांनी सांगितले.
तसेच राज्यसभेच्या सहाव्या उमेदवारासाठी मतांची गोळा बेरीज काय आहे याचं विश्लेषण बैठकीत केले. भुजबळांच्या नेतृत्वात आम्ही भाजपा नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(BJP Chandrakant Patil) यांच्याशी चर्चा केली. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे ४ उमेदवार उभे आहेत. तर भाजपाचे ३ उमेदवार उभे आहेत. त्यामुळे भाजपानं या निवडणुकीत माघार घ्यावी त्याची परतफेड विधान परिषदेच्या निवडणुकीत करू असं बैठकीत सांगितले आहे अशी माहिती शिवसेना नेते अनिल देसाई यांनी दिली.
मविआ आणि भाजपाचा एकमेकांना प्रस्तावराज्यसभेच्या सहा जागांसाठी शिवसेनेने २, भाजपाने ३ तर काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रत्येकी १ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे सहाव्या जागेवर कोण निवडून येणार यासाठी चुरस निर्माण झाली आहे. मात्र तत्पूर्वी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मविआ नेते आणि भाजपा नेत्यांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत मविआने भाजपाला राज्यसभा निवडणूक बिनविरोध करा त्याऐवजी आगामी विधान परिषद निवडणुकीत भाजपाला पाचवी जागा देऊ असा प्रस्ताव दिला. मात्र फडणवीसांनीही राज्यसभेच्या निवडणुकीत मविआने माघार घ्यावी त्याबदल्यात विधान परिषेदत १ जागा सोडू असा फेरप्रस्ताव दिला. त्यामुळे आता राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.